Loksabha 2019 : तरुणांवरच पक्षांची भिस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

तरुणांच्या सूचनांचा विचार
बूथप्रमुख, ब्लॉकप्रमुख, विविध परवानग्या घेणे, सभा व पदयात्रा यांसह अन्य पद्धतीने प्रचाराचे नियोजन करणे, सोशल मीडिया, वॉररूम सांभाळणे, घरोघरी जाऊन पक्षाचे पत्रक वाटणे इत्यादी महत्त्वाच्या कामांची जबाबदारी तरुण कार्यकर्त्यांवर देण्यात आली आहे. प्रचाराची व्यूहरचना आखताना ज्येष्ठ पदाधिकारी म्हणतील तेच खरे, असे न करता तरुण पदाधिकाऱ्यांची मते विचारात घेतली जात आहेत.

पुणे - निवडणुकीत दांडगा जनसंपर्क व अनुभवी व्यक्तीला उमेदवारी देण्याला पक्षांकडून प्राधान्य दिले जाते. मात्र, ज्या पक्षाकडे तरुण कार्यकर्ते जास्त; त्या पक्षाचा विजय निश्‍चित मानला जात आहे. पुण्यातही उमेदवाराचा चेहरा घरोघरी पोचविण्याचे काम, प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी करावी लागणारी धावपळ, यासाठी तरुणांवरच पक्षाची भिस्त आहे. पक्षात महत्त्वाचे निर्णय घेताना तरुणांची बाजू ऐकून घेतली जात आहे.

भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो की, मनसे अशा सर्वच पक्षांमध्ये तरुणांना महत्त्व दिले जात आहे. विद्यार्थी आघाडी असो की युवा मोर्चा यातून तरुणांना पक्षांकडे आकर्षित केले जात आहे. लोकसभा निवडणुकीत १८ ते ३० वयोगटातील नवख्या मतदारांवर पक्षांचा डोळा असल्याने प्रचारातही तरुण पदाधिकाऱ्यांना महत्त्व दिले जात आहे. त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या जात आहेत. 

भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक पोटे म्हणाले, ‘‘भाजपमध्ये तरुणांना महत्त्व दिले जाते. निवडणूक प्रचाराच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये माझ्याकडे लोकसभा सहसंयोजक हे पद दिले आहे. लोकसभेचा प्रचार वेगात करण्यासाठी पक्षाची यंत्रणा तयार असून तरुण कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.’’

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश कामठे म्हणाले, ‘‘यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा आताच्या निवडणुकीमध्ये तरुणांच्या प्रश्‍नांना महत्त्व दिले जात आहे. राष्ट्रवादीमध्ये तरुण कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आमच्याकडे दिल्या आहेत.’’ 

कसबा मतदारसंघ यू काँग्रेसचे अध्यक्ष ऋषिकेश वीरकर म्हणाले, ‘‘राजस्थान, मध्य प्रदेश येथील निवडणुकांमध्ये काँग्रेसने तरुणांना संधी दिली होती. त्यामुळे पक्षाचा विजय झाला. आता हाच बदल आपल्याकडेही होत आहे. निवडणुकीचा प्रचारात तरुण कार्यकर्त्यांच्या सूचना स्वीकारून त्यांची अंमलबजावणीही केली जात आहे.’’ 

Web Title: Loksabha Election 2019 Youth Political Party