Loksabha 2019 : आता उत्सुकता युतीच्या उमेदवारांची

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आल्याने भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांची यादी केव्हा, याबाबत उत्सुकता वाढली आहे. बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप कोणाला निवडणूक रिंगणात उतरवणार याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पहिल्या यादीत समावेश नसल्यानेही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

कॉंग्रेसपाठोपाठ आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने दहा जागांची नावे जाहीर केली. ही सर्व नावे अपेक्षितच होती. बारामतीमध्ये सुळे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कोण येणार, याबाबतच्या चर्चेला आता वेग आला आहे. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत अद्यापही स्पष्टता नाही. जानकर निवडणूक लढलेच तर ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनेच लढतील असे सांगण्यात येते. स्वतः जानकर यांनी मात्र कोणत्या मतदारसंघातून लढणार याबाबत आपली भूमिका गुलदस्तात ठेवली आहे. त्यामुळे बारामतीच्या लढतीबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. भाजपच्या वतीने खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांच्या नावाचीही बारामतीमधून चर्चा सुरू झाली आहे. मात्र काकडे यांनी त्याला दुजोरा दिलेला नाही.

मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे. परंतु, त्याची घोषणा पहिल्या यादीत होऊ शकली नाही, याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शिवसेनेकडून या मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच रिंगणात असतील, असे सांगण्यात येत आहे.

मावळबाबत भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिरूर मतदारसंघात शिवसेनेकडून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच निवडणूक लढविणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अमोल कोल्हे यांचे नाव निश्‍चित मानले जाते. मात्र, त्यांच्या नावाचीही घोषणा झालेली नाही.

पुण्यात कॉंग्रेस-भाजपमध्ये रस्सीखेच
पुण्यातील जागेबाबत कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात इच्छुकांमध्ये रस्सीखेच आहे. कॉंग्रेसमध्ये अद्यापही निष्ठावंत की "आयात' असा संघर्ष असून, माजी आमदार मोहन जोशी, प्रवीण गायकवाड, अभय छाजेड, संजय काकडे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. भाजपमध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे युतीचे समन्वयकाची जबाबदारी सोपविल्याने त्यांच्या उमेदवारीचे काय? अशी चर्चा रंगली. भाजपकडून बापट, विद्यमान खासदार अनिल शिरोळे की नवा चेहरा याबाबत उत्सुकता आहे. भाजपची पहिली यादी 16 मार्चला जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Yuti Shivsena Bjp Politics