Loksabha 2019 : थोड्या फरकाने का होईना, आम्हीच येणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 May 2019

लोकसभा निवडणुकीच्या मावळ लोकसभा मतदारसंघात खरी लढत भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यातच रंगली.

पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या मावळ लोकसभा मतदारसंघात खरी लढत भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यातच रंगली. तिसरा प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील हे कोणाची मते जास्त खेचणार यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. मात्र, ‘थोड्या फरकाने का होईना, आपलाच उमेदवार निवडून येणार’ असे छातीठोकपणे सांगताना कार्यकर्त्यांकडून बेरजेची गणिते मांडली जात आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मावळ मतदारसंघातील सर्वच पक्षांमधील गट-तट व मित्र पक्षांतील नेत्यांनी हेवे-दावे बाजूला ठेवले. महायुतीच्या गोटात भाजप, शिवसेनेसह रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना यांचा समावेश होता. तर महाआघाडीच्या गोटात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष (गवई व कवाडे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा समावेश होता. तसेच निवडणूक प्रचारादरम्यान वेगवेगळ्या समाज संस्था, संघटनांनी आपापल्या पसंतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. आता मतदान झाल्यामुळे कोण कोणास भारी पडणार यावर चर्चा सुरू आहे. कोणत्याही स्थितीत हॅटट्रिक साधण्यासाठी शिवसेनेने आटापिटा केला. आढेवेढे घेत शहर भाजपची त्यांना साथ मिळाली. यामागे मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत; तर सलग दोन वेळा झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी राष्ट्रवादीने केलेली व्यूहरचना यशस्वी होते की नाही, याकडे लक्ष लागले आहे. कारण राष्ट्रवादीला शहरातून काँग्रेसची, मावळ तालुक्‍यातून पक्षातील नाराजांची आणि उरण, कर्जत, पनवेलमधून शेतकरी कामगार पक्षाची साथ मिळाली आहे. 

जगतापांची परीक्षा
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (शिवसेना) आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात कटुता होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ‘बाणा’च्या साथीला ‘लक्ष्मणा’ची साथ मिळाली. दोन लाखांचे लीड चिंचवडमधून देण्याचे जगतापांनी जाहीर केले. प्रचारातही ते सक्रिय झाले. आता प्रतीक्षा निकालाची आहे. तो सकारात्मक लागला तर श्रेय जगतापांना जाणार आणि नकारात्मक लागल्यास संशयाची सुई त्यांच्याकडेच असणार. अर्थात खरे काय, हे मतमोजणीनंतरच कळेल. 

असे आहे गणित 
२०१४ च्या निवडणुकीत बारणे शिवसेनेचे, तर जगताप शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते. त्यांना अनुक्रमे पाच लाख १२ हजार व तीन लाख ५४ हजार मते मिळाली होती. दोघांमध्ये एक लाख ६८ हजार मतांचा फरक होता. राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना केवळ एक लाख ८२ हजार मते मिळाली होती. यंदा शेकाप राष्ट्रवादीकडून तर जगताप महायुतीत आहेत. शेकापचा कर्जत, उरण व पनवेलमध्ये प्रभाव आहे. मात्र, त्यांचा एकही आमदार नाही. चिंचवड विधानसभा क्षेत्रात जगतापांचा प्रभाव आहे. गेल्या वेळी त्यांना मिळालेल्या मतांची विभागणी केल्यास शेकापची एक लाख ७७ हजार मते गृहीत धरता येतील. शिवाय तीन लाख नवमतदार वेगळे. असे गणित महायुतीकडून मांडले जात आहे. 

मित्रांसोबत राष्ट्रवादीची मांडणी 
एकेकाळी पवार समर्थक असलेले जगताप भाजपच्या गोटात आहेत. महापालिकेत कमळ फुलवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. म्हणूनच महायुतीची भिस्त त्यांच्यावर आहे. मात्र, पवार यांना मानणारा मोठा वर्गही शहरात आहे. त्यातील एक ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचे चिरंजीव निहाल यांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश. तसेच, मावळ तालुका राष्ट्रवादीमधील सर्व गटतट एकत्र आणण्यात पवार यांना यश आलेले आहे. त्यांना काँग्रेसचा ‘हात’ मिळालेला आहे. घाटाखालील शेकाप आणि कर्जत विधानसभा क्षेत्रातील स्वपक्षाची ताकद या जोरावर राष्ट्रवादीने विजयाच्या बेरजेचे गणित मांडले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maval Lok Sabha Constituencies in Lok Sabha elections