Loksabha 2019 : मोहन जोशी यांच्याकडे पावणेसात कोटींची संपत्ती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

विधान परिषदेतील माजी आमदार आणि लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांची कौटुंबिक संपत्ती सुमारे पावणेसात कोटी रुपये आहे.

पुणे - विधान परिषदेतील माजी आमदार आणि लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांची कौटुंबिक संपत्ती सुमारे पावणेसात कोटी रुपये आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जोशी यांनी दिलेल्या शपथपत्रात कौटुंबिक संपत्तीचा उल्लेख केला आहे. 

जोशी यांच्याकडे जंगम मालमत्ता 67 लाख 47 हजार रुपये असून, त्यांच्या पत्नीच्या नावे 26 लाख 72 हजार रुपये इतकी आहे. त्यामध्ये दागिने, वाहन, बॅंकेतील बचत खात्यातील रक्‍कम यांचा समावेश आहे. जोशी यांच्याकडे एक लाख 72 हजार 380 रुपयांची रोकड, तर पत्नीकडे एक लाख 44 हजारांची रोकड आहे. बॅंकेमधील बचत खात्यात एकूण आठ लाख 85 हजार रुपये, तर पत्नीच्या नावे दोन लाख 66 हजार रुपये आहेत. 

वाहनांच्या ताफ्यात टोयाटो इनोव्हा आणि क्रेस्टा या दोन गाड्या आहेत. सध्या बाजारभावानुसार त्यांची किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे 127 ग्रॅम सोन्याचे दागिने असून, त्याची किंमत 3 लाख 61 हजार रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे 440 ग्रॅम सोन्याचे दागिने असून, त्याची किंमत सुमारे 13 लाख 61 हजार रुपये इतकी आहे. 

जोशी यांची कौटुंबिक स्थावर मालमत्ता सुमारे पाच कोटी 80 लाख रुपये इतकी आहे. त्यात मुळशी तालुक्‍यात अर्धा एकर जमीन असून, त्याचे बाजारभावानुसार मूल्य सात लाख रुपये आहे. याशिवाय, पुण्यातील शुक्रवार पेठ आणि मुंबईतील अंधेरी येथे दोन सदनिका आहेत. त्यांचे मूल्य सुमारे एक कोटी 53 लाख रुपये आहे. तर, पत्नीच्या नावे असलेल्या सोपानबाग येथील सदनिकेची किंमत सुमारे 3 कोटी 40 लाख रुपये आहे. 

दरम्यान, जोशी दाम्पत्त्यावर एकूण तीन कोटी 52 लाख रुपयांचे बॅंकेचे कर्ज आहे. त्यामध्ये जोशी यांच्यावर 40 लाख 58 हजार रुपये आणि पत्नीच्या नावे सुमारे तीन कोटी 11 लाख रुपयांचे गृहकर्ज आहे. 

Web Title: Mohan Joshi owns assets worth crores of rupees