Loksabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

बारामती मतदार संघाची जबाबदारी असणाऱ्या 25 पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर पुण्यात हॉटेल सन्मान येथे घेण्यात आले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्येही प्रवेश केल्याची माहिती मिळाली. 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून कमळ फुलविण्यासाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकद लावत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बारामती मतदार संघाची जबाबदारी असणाऱ्या 25 पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर पुण्यात हॉटेल सन्मान येथे घेण्यात आले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्येही प्रवेश केल्याची माहिती मिळाली. 

गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी कप-बशी या चिन्हावर निवडणूक लढविली होती. त्यात सुळे यांनी जानकर यांचा 69 हजार 719 मतांनी पराभव केला होता. पण, त्यात सुळे यांना 48.88 टक्के मिळाली होती. तर, जानकर यांच्या मतांची टक्केवारी 42.35 होती. यंदा बारामती लोकसभा मतदार संघातून भाजपच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी पक्षातर्फे मोर्चे बांधणी करण्यात येत आहे. हा मेळावा देखील त्याच मोर्चेबांधणीचा एक भाग असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. 

बारामती राष्ट्रवादी काँग्रेस शहराचे उपाध्यक्ष अमोल देवकाते, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अर्चना पाटील यांच्यासह इंदापूर, भोर येथील वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते पक्षात आल्याची माहितीही त्यांनी दिली. 
बारामती परिसरात काम करणाऱ्या काही तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार भिमराव तापकीर, बाळा भेगडे यांनी या तरुणांना बारामती लोकसभा मतदार संघात कशा प्रकारे काम करणे आवश्‍यक असल्याचे मार्गदर्शन केले. 
 

Web Title: NCPs baramati office bearers meeting in Pune for loksabha election