Loksabha 2019 : ठाकरे पितापुत्रांच्या तोफा धडाडणार, पुढल्या आठवड्यात वाढणार प्रचाराचा जोर    

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

पिंपरी(पूुणे) : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे या दोघांमध्ये होणारी मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बारणे यांच्या प्रचारासाठी 24 एप्रिलला आदित्य ठाकरे यांची, तर 25 एप्रिलला उद्धव ठाकरे यांच्या तोफा चिंचवडमध्ये धडाडणार आहेत.

पिंपरी(पूुणे) : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे या दोघांमध्ये होणारी मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बारणे यांच्या प्रचारासाठी 24 एप्रिलला आदित्य ठाकरे यांची, तर 25 एप्रिलला उद्धव ठाकरे यांच्या तोफा चिंचवडमध्ये धडाडणार आहेत.

पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच शेकापचे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची सभा या निवडणुकीचे आकर्षण ठरणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवार (ता. 12 ) अखेरचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढणार आहे. 

भाजपचे केंद्रीय मंत्री प्रचाराला 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये मावळचा उल्लेख केला होता. त्यामुळे केंद्रातील मंत्री प्रचारासाठी मावळ मतदारसंघात येणार आहेत. लोकसभेचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिलला होणार आहे. त्यात राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील शहरांचा समावेश आहे. सध्या केंद्रातील मंत्री या भागातील भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यग्र आहेत. 19 ते 27 एप्रिलदरम्यान ते मावळ मतदारसंघात प्रचारासाठी येणार असून, सभांबरोबरच प्रचार फेऱ्या, मेळावे यांचे आयोजन करण्यात येणार आहे. पनवेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे नियोजन करण्यात येणार असून, त्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यामध्ये मनोमीलन झाल्यामुळे शहरात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बारणे यांच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत. 

शरद पवार, उदयनराजे भोसलेही 
पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी शनिवारी (ता. 13) साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात शरद पवार यांच्या सभा शहरात होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे शहरात आयोजन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

ओवेसी, आंबेडकरांच्या सभा 
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापैकी एक सभा पनवेल किंवा उरण परिसरात होणार असून, दुसरी पिंपरीमध्ये घेण्याचे नियोजन आहे. 
 

Web Title: from the next week uddhav and aditya thackeray's rally will be frequent