esakal | Loksabha 2019 : पार्थचा पराभव धक्कादायक - अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Parth Pawars defeat is shocking First reaction of Ajit Pawar after loksabha 2019 result
  • लोकसभा निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
  • अपयशाने खचून न जाता विधानसभा निवडणूकीसाठी तयारी करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन
  • 'केंद्रातील सरकारने या देशातील जनतेच्या कल्याणासाठी काम करावे'

Loksabha 2019 : पार्थचा पराभव धक्कादायक - अजित पवार

sakal_logo
By
मिलिंद संगई

लोकसभा 2019
बारामती शहर : 'लोकसभा निवडणूकीमध्ये जनतेने जो कौल दिला, तो मान्य आहे, पाच वर्षासाठी मतदारांनी भाजपला पुन्हा संधी दिलेली आहे, निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो,' अशी प्रतिक्रीया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

निवडणूक निकालानंतर प्रथमच त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली. 
अजित पवार म्हणाले, 'निवडणूक म्हटली की हार जीत सुरुच राहते, मात्र माझे राष्ट्रवादी व काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांना असे आवाहन आहे की, अपयशाने तुम्ही खचून जाऊ नका, काही महिन्यातच विधानसभेची निवडणूक आहे, त्यामुळे त्या निवडणूकीच्या तयारीला लागावे. राज्यात अनेक भागात दुष्काळाचे सावट आहे, दुष्काळात जनतेला कशी मदत होईल याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी.'

'कोणी काहीही म्हणत असले तरी भाजपला इतके प्रचंड यश मिळेल याची खात्री कोणालाच नव्हती, मात्र या देशातील जनतेने नरेंद्र मोदी व भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे, केंद्रातील सरकारने या देशातील जनतेच्या कल्याणासाठी काम करावे, मी सर्वांचेच मनापासून अभिनंदन करतो.
शहरी भागातील मतदारांसह ग्रामीण भागातील मतदारांनीही यंदा भाजप सेना युतीसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने तर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे पराभव झाला आहे. अर्थात लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य करतो आहोत, पुढील पाच वर्षांच्या कामकाजासाठी माझ्या सर्वांनाच शुभेच्छा आहेत.' 

पार्थचा पराभव धक्कादायक...
पार्थ पवार याचा पराभव धक्कादायक निश्चित आहे, आम्ही प्रचंड मेहनत घेतली होती, मतदारांपर्यंत पोहोचलो होतो, मात्र केवळ मावळमध्येच नाही तर देशाच्या सर्वच भागात लोकांनी वेगळाच निर्णय घेतलेला होता, त्यामुळे या निवडणूकीत पराभवाला सामोरे जावे लागले. जनतेने दिलेला निर्णय आम्ही मान्य करतो आहोत, मात्र खचून न जाता या भागाच्या विकासासाठी आगामी काळातही आम्ही मनापासून प्रयत्न करु, असे अजित पवार म्हणाले.