Loksabha 2019 :  रणरणत्या उन्हातही उत्साह 

Loksabha 2019 :  रणरणत्या उन्हातही उत्साह 

पिंपरी -  उत्साह, लगबग आणि सेल्फीचा आनंद असे वातावरण सोमवारी मावळ मतदारसंघात बघायला मिळाले. सायंकाळपर्यंत ५८.२१ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, सहानंतरही मतदान केंद्रांवर रांगा असल्याने टक्केवारी वाढू शकते, अशी शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. 

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार अशी दुरंगी लढत झाली. अन्य १९ उमेदवारही रिंगणात होते. मात्र, त्यांचा फारसा प्रभाव व प्रचार दिसला नाही. मतदारसंघातील पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ व रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल व कर्जत या सहाही विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये सकाळी मोठा उत्साह होता. शहरातील पिंपरी, चिंचवडमध्ये बहुतांश ठिकाणी रांगा होत्या. यामुळे मतदानाची टक्केवारी साठच्या वर जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदारांची संख्या घटली. बहुतांश मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. चारनंतर पुन्हा रांगा दिसू लागल्या. त्यामुळे ६० च्या जवळपास टक्केवारी जाणार 

असा अंदाज होता. 
सकाळी नऊपर्यंत ६.१५ टक्के मतदान झाले. यात उरण व चिंचवड टक्केवारीमध्ये पुढे होते. अकरापर्यंत हीच आकडेवारी १९.७२ टक्‍क्‍यांवर पोचली. नंतर दोनला ती ३१.८५ टक्के झाली. यात चिंचवडमध्ये सर्वाधिक ३५.०८ टक्केवारी होती. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बारणे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप राहतात. सुरवातीपासून भाजपला मानणारा वर्ग येथे आहे. दुसऱ्या क्रमांकाची टक्केवारी पनवेल विधानसभा मतदारसंघात ३१.९० होती. याचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे आहे. 

यानंतरची तिसऱ्या क्रमांकाची टक्केवारी शिवसेना आमदार असलेल्या उरणमधील ३१.४० टक्के, चौथ्या क्रमांकाची टक्‍केवारी ३०.१० मावळमधील असून, हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, असा अंदाज होता. तो खरा ठरत मावळ विधानसभा क्षेत्रातील टक्का ६२ पर्यंत पोचला.  खालोखाल चिंचवड व पिंपरीचे मतदान होते.

ग्रामीणमध्ये जास्त
मावळ मतदारसंघाची शहरी पनवेल, पिंपरी, चिंचवड व ग्रामीण मावळ, उरण, कर्जत विधानसभा क्षेत्र अशी विभागणी केली जाते. ग्रामीण भागात साठपेक्षा अधिक टक्केवारी मतदानाची आहे. मात्र, शहरी भागातील टक्केवारी सायंकाळी सहापर्यंत साठपेक्षाही कमी होती. सहानंतरही काही मतदान केंद्रांवर रांगा असल्याने शहरी भागातील मतदानही साठचा आकडा गाठेल, असा विश्‍वास प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.   

दोघेही आपलेच... 
मोशीतील फुले विद्यालय केंद्राजवळ काही ज्येष्ठ नागरिक गप्पा मारत होते. त्यांचा कानोसा घेतला. बोलण्यावर ते जुन्नर-आंबेगाव तालुक्‍यातील वाटले. एका आजोबा म्हणाले, ‘काय वाटतं तुम्हाला? कोण येणार?’ दुसरे आजोबा म्हणाले, ‘काय सांगायचं. दोघंबी आपलेच आहेत. आढळरावांच काम चांगलंय, पण काय सांगता येत नाही. कोण येईल ते.’

..आणि पाणी मिळाले 
दुपारी एकच्या सुमारास आमदार महेश लांडगे मोशीतील केंद्र परिसरात आले. मतदानाच्या टक्केवारीचा आढावा घेतला. ‘‘दादा, पाण्याची सोय नाही. काही तरी करायला पाहिजे.’’ आमदार लांडगे यांनी सांगताच दोन कार्यकर्ते दुचाकी घेऊन गेले. पाच मिनिटांत पाण्याचे जार व बाटल्या घेऊन आले. 

कुबडी घेऊन जा... 
‘अहो, मी दोन वेळा गेलो मतदान करायला; पण ती रांग पाहून परत आलो. आता दुपारी तीन-साडेतीनला जाऊन करतो मतदान.’ एक प्रौढ व्यक्ती दुसऱ्या समवयस्कांना सांगत होती. साठीतले गृहस्थ म्हणाले, ‘‘अहो, रांग कितीही मोठी असू द्या. मतदान करणं सोप्प आहे. ती बघा, त्यांची कुबडी घेऊन जा. एका पायाने थोडे लंगडत चला. लगेच तुमचा नंबर लागेल.’’

थोडीशी पोटपूजा... 
बंदोबस्त किंवा कर्तव्यावर असताना मतदान अधिकारी व पोलिसांना जागेवर इतरत्र जाता येत नाही. दुपारचे भोजनसुद्धा त्यांना जागेवरच घ्यावे लागले. केंद्रांबाहेर नियुक्ती असलेले पोलिस तिथेच ठेवलेल्या बेंचवर बसून जेवण करत होते, तर शाळा इमारतीच्या प्रवेशद्वारावर केंद्रीय राखीव पोलिसांनी बसून जेवण घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com