Loksabha 2019 : पुण्यात निम्मेच मतदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा निवडणूक प्रशासनाने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार या मतदारसंघात 49.84 टक्के मतदान झाले. 

पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा निवडणूक प्रशासनाने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार या मतदारसंघात 49.84 टक्के मतदान झाले. जवळपास निम्म्याच पुणेकरांनी मतदानाचा हक्‍क बजावला. मागील लोकसभा  निवडणुकीत 54.14 टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा मतदानात सव्वाचार टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. 

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गिरीश बापट आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यात चुरशीची लढत आहे. या मतदारसंघासाठी मंगळवारी (ता.23) मतदान झाले. मतदानाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून आकडेवारी एकत्रित करण्याचे काम सुरू होते. जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी 52 टक्के जवळपास मतदान झाल्याचे सांगितले होते. परंतु, ही अंतिम आकडेवारी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. 

मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा प्रशासनाने अंतिम आकडेवारी जाहीर केली. पुणे लोकसभा मतदारसंघात 20 लाख 75 हजार 39 मतदार आहेत. त्यापैकी 10 लाख 34 हजार 154 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 46.41 टक्के, शिवाजीनगर 46.94, कोथरूड 50.26, पर्वती 52.07, पुणे कॅन्टोन्मेंट 48.79 आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 55.88 टक्के मतदान झाले आहे. काही विधानसभा मतदारसंघांत निम्म्यांहूनही कमी मतदान झाले. वडगाव शेरी आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन लाखांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

पुणे लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदारांपैकी 10 लाख 67 हजार 587 पुरुष मतदार आहेत. त्यापैकी पाच लाख 51 हजार 91 म्हणजे 51.62 टक्‍के पुरुष मतदारांनी मतदान केले. तर, 10 लाख सात हजार 372 महिला मतदारांपैकी चार लाख 83 हजार 56 म्हणजे 47.95 टक्‍के महिलांनी मतदान केले. तसेच, 80 तृतीय पंथीयांपैकी सात जणांनी मतदान केले. 

मतदानाचा टक्‍का का घटला? 
जिल्हा प्रशासनाने शेवटच्या क्षणापर्यंत मतदार नोंदणी अभियान राबविले. तसेच, "स्वीप' उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती केली. त्यामुळे नवमतदारांच्या संख्येत चांगली वाढ झाली. परंतु, मतदारयाद्यांमधील दुबार नावे, स्थलांतरित आणि मृत व्यक्‍तींची नावे वगळण्यात आली नाहीत. काही मतदारांना त्यांची नावे यादीत नसल्यामुळे नावाची शोधाशोध सुरू होती. काही मतदारांना "व्होटर स्लीप' मिळाली, पण मतदान केंद्रांवरील यादीत नाव नव्हते. तसेच शहरी मतदारांमधील निरुत्साह या कारणांमुळे मतदानाचा टक्‍का घसरल्याचे सांगितले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Lok Sabha constituency polling 49.84 per cent