Rahul Gandhi Pune : शिक्षणातील बदलाची "ब्लू प्रिंट' तयार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

सध्याची शिक्षण पद्धती ही बेरोजगारी निर्माण करणारी आहे. कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धती निर्माण करणे, काळाची गरज आहे. विद्यापीठांमध्ये कौशल्याधारित शिक्षण मिळत नसल्याने त्यात प्राधान्याने बदल करण्याची आवश्‍यकता आहे. या बदलाची "ब्लू प्रिंट' आमच्याकडे तयार असून, आम्ही सत्तेवर आल्यानंतर ती राबवू, असे आश्‍वासन कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुकवारी दिले. 

पुणे - सध्याची शिक्षण पद्धती ही बेरोजगारी निर्माण करणारी आहे. कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धती निर्माण करणे, काळाची गरज आहे. विद्यापीठांमध्ये कौशल्याधारित शिक्षण मिळत नसल्याने त्यात प्राधान्याने बदल करण्याची आवश्‍यकता आहे. या बदलाची "ब्लू प्रिंट' आमच्याकडे तयार असून, आम्ही सत्तेवर आल्यानंतर ती राबवू, असे आश्‍वासन कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुकवारी दिले. 

युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि नॅशनस स्टुडंट्‌स युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयूआय) वतीने आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सध्याची शिक्षणपद्धती, वाढती बेरोजगारी, नोटाबंदीचा फटका आणि मोदी सरकारच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्यांनी पंचावन्न मिनिटांच्या भाषणात मनमोकळी उत्तरे दिली. "आभासी जगात राहायचे की नाही, हे तुम्ही ठरवा. कधी ना कधी तुम्हाला वास्तवाला सामोरे जावे लागणार आहे, त्यामुळे मी आभासी जगात राहत नाही,' असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. "कॉंग्रेसचा जाहीरनामा हा पक्षाचा जाहीरनामा नसून, तो देशातील सर्व घटकांशी संवाद साधून तयार केला आहे,' असा दावाही त्यांनी केला. 

देशात दर चोवीस तासांमध्ये सुमारे सत्तावीस हजारांहून अधिक नोकऱ्या जातात. याउलट चीनमध्ये दर चोवीस तासांमध्ये 15 हजार रोजगारांची निर्मिती होते, असे सांगून गांधी म्हणाले, ""तुम्ही देशाची संपत्ती आहात. युवकांना रोजगार मिळाला तरच देशाचा विकास शक्‍य आहे. बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. कौशल्याधारित शिक्षण व्यवस्था निर्माण केल्याखेरीज बेरोजगारीतून मुक्ती मिळणे शक्‍य नाही. आपल्या विद्यापीठांमधून मिळणाऱ्या शिक्षणाला व्यावहारिकतेची जोड मिळायला हवी. उच्च शिक्षणात व्यापक बदल झाल्याशिवाय रोजगार निर्माण होणार नाही. सध्याच्या शिक्षण पद्धतीत हे बदल करण्यासाठी आमची "ब्लू प्रिंट' तयार आहे.'' 

राहुल गांधी म्हणाले... 
- मी मोदींवर प्रेम करतो, ते माझा द्वेष करतात. 
- लोकांच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास मोदी का घाबरतात? 
- द्वेषाने आणि हिंसेने केवळ नुकसानच होते. 
- 72 हजार रुपये देण्यासाठी रक्कम उभारण्याची जबाबदारी माझी. 
- पुणे हे उच्च शिक्षणाचे केंद्र आहे. 
- शिक्षणातील बदलाची "ब्लू प्रिंट' तयार. 
- राजकारणातून साठ वर्षांनंतर निवृत्त व्हावे, असे वाटते. 
- एअर स्ट्राइक : हवाई दलाचे कौतुक; पण त्यावरून राजकारण नको. 

Web Title: Rahul Gandhi Pune Blue Print ready for change in education