Loksabha 2019 :  पदयात्रा अन्‌ सोशल मीडिया

Loksabha 2019 :  पदयात्रा अन्‌ सोशल मीडिया

पुणे - लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात येऊ लागला असून, मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांकडून रोड शो, पदयात्रांबरोबरच सोशल मीडियावरही भर दिला असल्याचे चित्र पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर मतदारसंघांत दिसत आहे. शहरी भागात मतदारांच्या हजारी याद्यांवर लक्ष केंद्रित केले असून, ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवरील कार्यकर्त्यांवर उमेदवारांची भिस्त आहे.

पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी २३ एप्रिल, तर शिरूर आणि मावळसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी अवघे १७ दिवस राहिल्यामुळे पुणे आणि बारामतीमध्ये प्रचारासाठी धांदल उडाली आहे. पुण्यामध्ये भाजपने हजारी यादीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी कार्यकर्ते नियुक्त केले आहे. त्या शिवाय विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून, त्यात नगरसेवक, माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते यांच्यावर जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यात शिवसेना, आरपीआयच्या कार्यकर्त्यांनाही सामावून घेतले आहे. काँग्रेसनेही विधानसभा मतदारसंघांबरोबरच शहरातील दहा ब्लॉकनुसार नियोजन केले आहे. पक्षाने प्रचाराला ३० मार्चपासूनच सुरवात केली असून, हजारी यादीनुसार जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. 

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. दौंड, इंदापूर, बारामती शहर व ग्रामीण, भोर वेल्हा, खडकसवासला मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागानुसार नियोजन केले आहे. कार्यकर्ते घरोघरी जाऊन स्लिपा देऊन प्रचार करीत आहेत. भाजपने जिल्हा परिषदच्या ३९ गटांनुसार रचना केली आहे. त्यानुसार ३९ सभा होणार असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही संपर्क यंत्रणेचा वापर करून घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यातील कार्यकर्त्यांच्या बैठका आता संपल्या असून, पुढील काळात व्यक्तिगत संपर्कावर भाजपचा भर असेल, असे पक्षाकडून सांगण्यात आले. 

मावळमध्ये पनवेल, उरण आणि कर्जतमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नियुक्त करण्यात आले आहेत. तर उर्वरित मावळमध्ये आणि पिंपरी- चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने प्रभागनिहाय जबाबदाऱ्यांचे कार्यकर्त्यांना वाटप केले आहे. माजी आमदार, नगरसेवक, माजी नगरसेवकांचा त्यात समावेश आहे. शिवसेनेनेही कार्यकर्त्यांच्या बळावर आणि संघटनात्मक नियुक्‍त्यांच्या आधारे भाजप कार्यकर्त्यांच्या मदतीने नियोजन  केले आहे. 

शिरूरमध्ये राष्ट्रवादीने वाड्या-वस्त्या आणि निमशहरी भागात कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. ग्रामपंचायतींच्या वॉर्डनुसारही कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्‍चित केली आहे. त्यावर आमदार- माजी आमदारांची नियुक्ती केली आहे. शिवसेनेची काही तालुक्‍यांतील संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्ते सोबत भाजपचे ‘नेटवर्क’ वापरले जात आहेत. शहरी भागातील हडपसरमध्ये हजारी यादी तर ग्रामीण भागासाठी वाड्या, वस्त्या, जिल्हा परिषदेचे गट या नुसार प्रचाराचे दोन्ही पक्षांनी नियोजन केले आहे.  

असा होतोय प्रचार 
  रोड शो, पदयात्रा, जाहीर सभा, कार्यकर्त्यांचे मेळावे, सोसायट्यांमध्ये बैठका, कोपरा सभा, महिलांचे मेळावे, घरोघरी प्रचार, स्लिपा वाटप करीत मतदारांशी संवाद व पत्रके पोचविण्यावर भर दिला आहे.
  शहरी भागात मतदारांच्या हजारी याद्यांवर भर दिला जात आहे. तसेच ग्रामीणमध्ये गटनिहाय नियोजन सुरू आहे.

व्हिडिओ ‘व्हायरल’वर भर
पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी सोशल मीडियाकडेही व्यवस्थित लक्ष दिले आहे. उमेदवारांचा दौरा कोठे असेल, याची माहिती देतानाच झालेल्या प्रचाराचीही छायाचित्रे तत्परतेने टाकली जात आहेत. भाषणांचे व्हिडिओ व्हायरल करतानाच घोड्यावरून प्रचाराला जाणे, पळत प्रचाराला जाणे, मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे, कार्यकर्त्यांच्या घरी झालेल्या भेटीगाठी आदींची छायाचित्रे, व्हिडिओ आवर्जून ‘व्हायरल’ करीत अनुकूल वातावरण निर्मिती करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com