Loksabha 2019 : विधानसभेसाठी शिवसेनेची लोकसभेच्या मैदानात खेळी

Loksabha 2019 : विधानसभेसाठी शिवसेनेची लोकसभेच्या मैदानात खेळी

पुणे - भारतीय जनता पक्षाशी काडीमोड घेत विधानसभा आणि महापालिका निवडणुका लढविलेल्या शिवसेनेत पराभवामुळे आलेली मरगळ आता दूर झाल्याचे चित्र पुण्यातही दिसत आहे. भाजपशी युती तुटल्यापासून या पक्षाच्या नेत्यांवर आगपाखड करणारे शिवसेनेचे नेते भलत्याच उत्साहाने लोकसभेच्या प्रचारात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत काम दाखवून विधानसभेला उमेदवारी पटकाविण्याची शिवसेनेतील इच्छुकांची खेळी उघड आहे. या निवडणुकीत शिवसेनेचा उत्साह वाढल्याने पक्षसंघटनेतही चैतन्य निर्माण झाले आहे.  

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत युतीच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांत राजकीय वैमनस्य वाढले. त्यानंतर गेली साडेचार वर्षे ही मंडळी संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर तुटून पडली. महापालिकेच्या निवडणुकीत तर त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोप टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या पुढील निवडणुकांत ‘युती’ होणार नाही, असे समजून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला. परंतु, शिवसेनेत निरुत्साहाचेच वातावरण पाहायला मिळाले.  

आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेनेने पुन्हा ‘युती’ केली. एकेमकांशिवाय पर्याय नसल्याची जाणीव झाल्याने या मंडळींनी ‘युती’च्या घोषणेनंतर आपले सूर जुळविण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला. यानिमित्ताने पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी किमान तीन जागा मिळण्याची अशा शिवसेनेच्या गोटात आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर होताच, शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी आमदार महादेव बाबर प्रचारात उतरले. 

गेली काही दिवस मोकाटे हे बापट यांच्या प्रचारात सर्वत्र फिरत असून, त्यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचा आदेश दिला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असला तरी बाबर हेही पुण्यात बापट यांच्यासाठी प्रचार करीत आहेत. मोकाटे आणि बाबर शहरभर फिरून शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेत असल्याने शिवसैनिकही जागे झाले आहेत. मोकाटे कोथरूड तर बाबर हे हडपसरमधून इच्छुक आहेत. 

सध्या दोन्ही मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. विद्यमान आमदार डावलून या दोन्ही जागा शिवसेनेला देताना भाजप नेतृत्वाची डोकेदुखी वाढणार आहे. मात्र, आपल्या हक्काच्या मतदारसंघात वर्चस्व निर्माण करण्याचा मोकाटे आणि बाबर यांचा  प्रयत्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com