पुणे - ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत यंदा अमोल कोल्हे यांनाही स्थान देण्यात आलेले आहे. पक्षाने जाहीर केलेल्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीत सर्वसमावेशकताही साधण्यात आली असून, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह विद्या चव्हाण यांनाही यादीत स्थान देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची यादी दिल्लीतून जाहीर केली. पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, डी. पी. त्रिपाठी, शंकरसिंह वाघेला, छगन भुजबळ यांनाही स्टार प्रचारक म्हटले आहे. माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव, तसेच दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे यांचाही त्यात समावेश आहे.
पुण्यातून जयदेव गायकवाड आणि शिरूरमधून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढवीत असलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनाही या यादीत आवर्जून स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांचीही त्यात निवड करताना युवकांनाही प्राधान्य देण्यात आले आहे.
चाळीस स्टार प्रचारक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत गणेश नाईक, सचिन अहिर, जितेंद्र आव्हाड, मधुकर पिचड, अरुण गुजराथी, अण्णा डांगे, दिलीप सोपल, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, नवाब मलीक, फौजिया खान, अब्दुल मजीद मेनन, चित्रा वाघ, प्रदीप सोळुंखे, हसन मुश्रीफ आदींचाही समावेश करण्यात आलेला आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत नव्या-जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.