Loksabha 2019 : आणि सुप्रिया सुळेंनी कविता म्हटली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी,'
'लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहानी....'

बारामती : 'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी,'
'लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहानी....'

कवी दासु वैद्य यांच्या कवितेतील दोन ओळी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणात सादर केल्या. यामध्ये वडील शरद पवार व त्यांच्यामधील बाप-लेकीच्या नात्यामध्ये असणाऱ्या मायेची, प्रेमाची, लढवय्या मुलीसाठी बुलंद पणे उभे राहणाऱ्या बापाच्या भावना व्यक्त केल्या. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामती मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या सांगता सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपर जोरदार टिका केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामती मतदारसंघातील पाण्यावरून अनेक उलटसुलट चर्चा झाल्या. परंतु, या भागाला केवळ अजित पवारच पाणी देऊ शकतात. या निवडणूकीच्या प्रचारात विकासाचा मुद्दा सोडून सर्वांनी पातळी सोडून भाषण केली. भाजपच्या अरुण जेटली यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला बारामतीचा विकास दिसला. पण अमित शहांना दिसला नाही. पन्नास वर्षात इथे काहीच झाल नसल्याची टिका शहांनी शरद पवारांवर केली. मात्र, अमित शहांच्या वयापेक्षा अधिक वर्ष पवार साहेबांनी महाराष्ट्राची सेवा केली असल्याचे सांगत सुळे यांनी अमित शहा यांचा चांगलाच समाचार घेतला.

संसदेत जाऊन जनतेसाठी चांगले कायदे बनविणे आणि त्याची अंमलबजानी करण्यासाठी मला खासदार व्हायचे होते. खासदार होण्यासाठी कोणी माझ्या मागे लागले नव्हते. मला स्वतःला खासदार होण्याची इच्छा होती. तुम्ही मागील पन्नास वर्षापासून पवार साहेबांच्या मागे उभे राहिल्यामुळे बारामतीचे नाव संपुर्ण देशात गेले. यातूनच तुमच्याकडून दहा वर्ष मला संधी दिलीत. या दहा वर्षात कुपोषण मुक्त मतदारसंघाच्या यादीत राज्यात बारामतीचा प्रथम क्रमांक असून देशात तिसरा क्रमांक आहे. या मतदारसंघात पाणी, शेती रोजगार यावर खूप काम झाले आहे. दुध संघ, एमआयडीसी, शेतीला हमीभाव मिळाला आहे. मला पुन्हा संधी दिल्यास यात आणखी भर घालून पुढील पाच वर्षात प्रत्येक तालुक्यात पासपोर्ट कार्यालय तयार करणार. असल्याचेही सुळे म्हणाल्या.

आज भाजपचे जेवढे काही लोक शिकले असतील ते सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस काळात बांधलेल्या शाळा, महाविद्यालयातून शिकले आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule said poetry for her father