Loksabha 2019 :  विकासकामे व उमेदवारीचा संबंध नाही -गिरीश बापट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

उमेदवारी आणि विकासकामे या वेगळ्या गोष्टी आहेत. याचा उमेदवारी बदलण्याशी काही संबंध नाही. उमेदवार हे नेते पक्ष संघटनेचा विचार करून ठरवतात. हे मी दादांना सांगण्याची गरज नाही. हे त्यांनाही माहिती आहे, असे प्रत्युत्तर महायुतीचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना दिले. 

पुणे - उमेदवारी आणि विकासकामे या वेगळ्या गोष्टी आहेत. याचा उमेदवारी बदलण्याशी काही संबंध नाही. उमेदवार हे नेते पक्ष संघटनेचा विचार करून ठरवतात. हे मी दादांना सांगण्याची गरज नाही. हे त्यांनाही माहिती आहे, असे प्रत्युत्तर महायुतीचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना दिले. 

कॉंग्रेसचे पुण्याचे उमेदवार मोहन जोशी आणि राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा अर्ज भरण्यात आला. त्या वेळी झालेल्या सभेत अजित पवार यांनी पुण्यात भाजपने अनिल शिरोळे यांना उमेदवारी नाकारली, यावर टीका केली. ""तुमचा कारभार चांगला म्हणून सांगता. मग विद्यमान खासदार शिरोळे यांना उमेदवारी का नाकारली?, याचे पुणेकरांना उत्तर द्या,'' असे आव्हान पवार यांनी दिले होते. 

त्याबाबत गिरीश बापट यांना विचारले असता त्यांनी, पवार यांनी केलेला आरोप फेटाळून लावत, ""निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक असतात, त्यापैकी एकाला पक्षाकडून उमेदवारी मिळते. पक्ष संघटनेचा विचार करून हा निर्णय पक्षाचे नेते घेत असतात, हे दादांना माहिती आहे,'' असे बापट यांनी सांगितले. 

""पुणे शहरासाठी जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचा प्रारूप आराखडा तयार झाला आहे. आमदार, खासदार यांच्याही सूचना घेऊन त्याला अंतिम स्वरूप देऊन योग्य वेळी तो जाहीर करू,'' असे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकटे, महादेव बाबर, अजय भोसले, प्रशांत बधे आदी या वेळी उपस्थित होते. 

Web Title: There is no connection between development works and candidacy says girish bapat