Loksabha 2019 : महाआघाडीकडे विकासाचा मुद्दाच नाही - उद्धव ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

 ""महाआघाडीकडे विकासाचा मुद्दाच नाही. त्यांना दिशा नाही. फक्त युती नको, मोदी नको, हाच त्यांचा विचार आहे,'' अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 

पिंपरी -  ""महाआघाडीकडे विकासाचा मुद्दाच नाही. त्यांना दिशा नाही. फक्त युती नको, मोदी नको, हाच त्यांचा विचार आहे,'' अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी वाकड येथे आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. खासदार संजय राऊत, अमर साबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे आदी उपस्थित होते. 

ठाकरे म्हणाले, ""पराभव दिसू लागल्याने विरोधकांनी निवडणूक प्रचारात विकासाऐवजी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला आहे. बारामतीकरांची भानामती आता चालणार नाही. ती महापालिका, जिल्हा परिषदा, विधानसभा व गेल्या लोकसभा निवडणुकीत संपवून टाकली आहे. आम्ही जनतेसाठी, देशाच्या विकासासाठी युती केली आहे. मोदींनाच पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. विरोधकांकडे पंतप्रधान कोण माहीत नाही. ममता बॅनर्जी बांगलादेशींना बोलावून सभा घेत आहेत. आजपर्यंत पवारांनी केवळ पाडापाडीचा धंदा केला आहे. वाजपेयी, गुजराल, व्ही. पी. सिंग यांची सरकारे पाडली आहेत.'' 

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर खासदार झाले. मात्र, 2014 च्या निवडणुकीत बारणे यांना उमेदवारी मिळाली होती. यामुळे बाबर शिवसेनेतून बाहेर पडले होते. आज त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray was speaking at a meeting organized at Wakad for the campaign of shrirang barne