Loksabha 2019 : दोन पाटलांच्या भेटीने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

  • आज भवानीनगर तालुक्यात काँग्रेसचा मेळावा
  • हर्षवर्धन पाटील व सुप्रिया सुळे हे इंदापूरमध्ये आघाडीच्या व्यासपीठावर एकत्र
  • हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा

लोकसभा 2019
भवानीनगर : आज तालुक्यात काँग्रेसचा मेळावा आयोजित केला असतानाच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी भेट झाल्याने सकाळी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र त्यानंतर हर्षवर्धन पाटील व सुप्रिया सुळे हे इंदापूरमध्ये आघाडीच्या व्यासपीठावर एकत्र आल्याने सकाळी सुरू झालेल्या राजकीय चर्चा अफवा होत्या, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी धर्म पाळत नाही, अशी तक्रार करीत काँग्रेस कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारापासून दूर होते. दरम्यानच्या काळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, त्यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेत आघाडीतील मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सुप्रिया सुळे यांचा मनापासून प्रचार करेल अशी ग्वाही दिली. त्यानंतर प्रचारही सुरू झाला. यामुळे सारे आलबेल वाटत असतानाच आज अकलूजकरांमध्ये व पाटील यांच्यात चर्चा झाल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या.

harshwardhan patil

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूजला सभा होत असल्याने त्यासंदर्भात एखादा राजकीय गौप्यस्फोट होणार काय इथपर्यंत चर्चा रंगली. मात्र त्यानंतर इंदापूरातील नियोजित काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा वेळेनुसार सुरू झाला. या मेळाव्यास खासदार सुप्रिया सुळे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील दोघेही एकत्र उपस्थित राहीले, हा मेळावा सुरू असल्याने पाटील यांनी अकलूजकरांच्या भेटीचा तपशील जाहीर केला नाही, मात्र काही दिवसांपूर्वीच पाटील यांनी काँग्रेस हा आमचा आत्मा असल्याचे जाहीर केलेले आहे, त्यामुळे पुन्हा त्यावर अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज नाही असे काँग्रेसच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

Web Title: Vijaysingh Mohite Patil meet Harshwardhan Patil on eve of Loksabha election