२६ हजार नवमतदारांना स्मार्ट कार्ड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

व्होटर स्लिपची छपाई सुरू
मतदारांना देण्यात येणाऱ्या व्होटर स्लिपच्या छपाईचे काम सुरू झाले आहे. मतदान केंद्राचे अधिकारी घरोघरी जाऊन या स्लिपचे वाटप करणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये या कामाला सुरवात होईल, असे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी दीपक वजाळे यांनी सांगितले.

चिंचवडमध्ये २० हजार, पिंपरीत ५ हजार ९२७ जणांचा समावेश
पिंपरी - शहरातील २५ हजार ९२७ नवीन मतदारांना आतापर्यंत ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये चिंचवडमधील २० हजार, तर उर्वरित पाच हजार ९२७ मतदार पिंपरीतील आहेत. येत्या दोन दिवसांत पिंपरी मतदारसंघातील आणखी सहा हजार ओळखपत्रे निवडणूक आयोगाकडून मिळण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर ती मतदारांना दिली जाणार आहेत.

निवडणूक ओळखपत्राचे स्वरूप बदलण्यात आले असून, ते आता स्मार्ट कार्ड झाले आहे. या कार्डवर बारकोड असून, त्यावर (epic) नंबर देण्यात आला आहे.

सध्या या कार्डच्या छपाईचे काम निवडणूक आयोगाकडून मुंबईत सुरू आहे. 
दरम्यान, नव्याने करण्यात आलेल्या नोंदणीमुळे चिंचवड मतदारसंघात २६ हजार ९७, तर पिंपरीमध्ये ११ हजार २४६ नवीन मतदारांची भर पडली आहे.

त्यामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. ३० सप्टेंबर २०१८ पूर्वी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या तीन लाख ३६ हजार ६४५ होती. चिंचवड मतदारसंघात हा आकडा चार लाख ७६ हजार ६४३ इतका होता. मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबविली होती. त्यामध्ये तरुणांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यास प्राधान्य दिले. 

नवीन नोंदणीनंतर पिंपरी मतदारसंघातील मतदारांची संख्या तीन लाख ४७ हजार ८९१, तर चिंचवड मतदारसंघातील संख्या पाच लाख दोन हजार ७४० झाली आहे.

Web Title: Voter Smart Card I-Card