Loksabha 2019 :  मतदारांनो, खोटेनाटे नको

Loksabha 2019 :  मतदारांनो, खोटेनाटे नको

पुणे - लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा ईव्हीएम मशिनसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) हे मशिन जोडले जाणार आहे. मतदान केल्यानंतर बाजूला असलेल्या व्हीव्हीपॅट मशिनच्या प्रिंटरवर आपण नोंदविलेले मत सात सेकंद मतदाराला दिसणार आहे. जर एखाद्या मतदाराने मतदान केलेल्या पक्षाचे चिन्ह व्हीव्हीपॅट मशिनवर दिसले नाही; दुसऱ्याच उमेदवाराचे अथवा पक्षाचे चिन्ह त्याच्यावर दिसले, अशी तक्रार केली; तर तातडीने तिची खात्री केली जाणार आहे. जर ती तक्रार खोटी ठरल्यास मतदाराला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी आयोगाने ही पावले उचलेली आहेत. ईव्हीएमच्या वापराबरोबरच आता व्हीव्हीपॅट मशिन जोडण्यात येणार आहे. यामुळे मतदाराला आपण नोंदविलेले मत प्रत्यक्ष त्याच उमेदवाराला मिळाल्याची खात्री पटणार आहे.

यंदा सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशिन वापरले जाणार आहे. त्यामुळे मतदारांना आपण नोंदविलेले मत त्याच उमेदवाराला मिळाले का, याची खात्री पटणार आहे. जर एखाद्या मतदाराने मतदान करतेवेळी व्हीव्हीपॅटवर आक्षेप नोंदविला आणि ज्या उमेदवाराला मत दिले त्याचे चिन्ह व्हीव्हीपॅटवर न दिसता दुसऱ्याच उमेदवाराचे चिन्ह दिसले, अशी तक्रार केली; तर त्याची दखल संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घेणार आहे. संबंधित मतदाराला खरेच असा प्रकार घडला आहे का, याची विचारणा अधिकारी करणार आहे. 

जर मतदार तक्रारीवर ठाम असेल, तर त्या मतदाराकडून एक अर्ज भरून घेतला जाणार आहे. यामध्ये जर मतदार खोटे बोलत असेल, तर सहा महिने शिक्षा अथवा एक हजार रुपये दंड होऊ शकतो. या नियमाची माहिती या अर्जामध्ये असणार आहे. त्यानंतर त्या मतदाराला पुन्हा टेस्ट व्होटची संधी दिली जाणार आहे. या वेळी त्या मतदारासोबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदान केंद्रावरील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि साक्षीदार उपस्थित राहणार आहेत. जर टेस्ट व्होटमध्ये मतदार खोटे बोलत असल्याचे सिध्द झाल्यास त्याला जागेवरच पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

गेल्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकीत ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. राजकीय पक्षांकडून याविषयी विविध आरोप केले होते. त्यामध्ये कोणत्याही उमेदवारासमोरचे बटन दाबले, तरी ठरावीक पक्षाच्या उमेदवाराला मत मिळते, असा एक आरोप होता. काही जणांनी याविषयीच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या होत्या, तर काही जणांनी याविषयी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने मतदाराने कोणाला मतदान केले, याची माहिती मतदाराला मिळण्यासाठी व्हीव्हीपॅट या मशिनवर दिलेले मत प्रिंट स्वरूपात दिसण्याची व्यवस्था केलेली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com