Loksabha 2019 : केडर मोडलेली पुणे काँग्रेस 

Congress
Congress

देशात सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षही आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. देशातील 543 लोकसभा मतदार संघात निवडणुकीची तयारीला वेग येत आहे. पण, पुण्यात काँग्रेसच्या आघाडीवर अद्यापही नीरव शांतता जाणवत आहे. नोटाबंदीच्या काळात हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी तासन्‌ तास रांगेत थांबलेले पुणेकर, आरोग्याचा वाढता खर्चामुळे हवालदिल झालेला मध्यम वर्ग, महागडे होत चाललेले शिक्षण, दिवसेंदिवस रोजगाराच्या कमी होत चाललेल्या संधी, वाढती बेरोजगारी असे प्रचाराचे मुद्दे, की जे थेट प्रत्येक पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे आहेत. पण, शहरातील प्रमुख नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येक जण आपले डोळे फक्त दिल्लीकडे लावून बसला आहे. हायकमांड पुण्यातील उमेदवारी जाहीर करेल आणि नंतर कामाला लागू, अशीच या सर्वांची भावना असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तहान लागल्यानंतर आड खणायला घेतल्यावर, स्थिती काय होते हे वेगळे सांगायची गरज नाही.
 
लोकसभेपासून ते जिल्हा परिषद, पंचायत समितीपर्यंतच्या सगळ्या निवडणुका लढविण्याचा काँग्रेस इतका अनुभव देशातील कोणत्याच पक्षाला नाही. स्वातंत्र्यानंतर 1951 साली देशात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस लढली होती आणि 2019 चीही लढत आहे. या पक्षाने देशावर एका-दोन नाही तर सहा दशके राज्य केले. अर्थात, त्यात पुण्यातील योगदान मोठे आहे. निवडणुकीच्या 67 वर्षांच्या इतिहासात काँग्रेसने पुण्यावर 39 वर्षे निर्विवाद राज्य केले. शहराचा कारभार या पक्षाने एकहाती ठेवला होता. भारतीय जनता पक्ष (भाजप), भारतीय लोकदल, संयुक्त समाज पक्ष आणि प्रजा समाज पक्ष अशा काँग्रेसेतर पक्षाचा पुण्यातील इतिहास हा उण्यापुऱ्या 29 वर्षांचा! त्यातही निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचा सलग पराभव झालाय, असं तर पुण्यात कधीच घडलं नाही. काँग्रेसच्या उमेदवाराच्या पराभवासाठी दहा-दहा वर्षे लागायची. त्यामुळे पुणे हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पुणं, या बालेकिल्ल्यावर भाजपने 1991 मध्ये पहिला हल्ला चढविला. अण्णा जोशी यांच्या रूपाने त्या वेळी पुण्यात प्रथमच कमळ फुलले. याला, राम मंदिराची पार्श्‍वभूमिवर मिळाली होती. त्यामुळे पुणेकरांनी ना. ग. गोरे (प्रजा समाज पक्ष), एस. एम. जोशी (संयुक्त समाज पक्ष), मोहन धारिया (भारतीय लोक दल) यांचा अपवाद वगळता प्रथमच गैरकाँग्रेसेतर उमेदवार पुण्यातून निवडून आला. त्यानंतर सुरेश कलमाडी आणि विठ्ठल तुपे यांनी पुण्याचा गड राखला खरा. पण, 1999 मध्ये प्रदीप रावत यांनी भाजपला पुन्हा विजय मिळवून दिला. त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांचा करिश्‍मा होता. अण्वस्त्र चाचण्या यशस्वी झालेल्या. त्यामुळे आत्ता चाळीशीत असणाऱ्यांनी त्या वेळी पहिल्यांदा मतदान केले होते. ते मत या तरुणांनी भाजपच्या पारड्यात टाकले. 
एकीकडे मतदार बदलत होता. तर दुसरीकडे, भाजप-काँग्रेस यांची पुण्यात टक्कर देत होते. यात "मी म्हणजे पुणं' असं म्हणत आलेल्या सुरेश कलमाडींनी पुणेकरांना जिंकलं. पुणे मॅरेथॉन, पुणे फेस्टिव्हल, "पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल', कॉमलवेल्थ युथ गेम अशा विविध उपक्रमातून पुण्याला आंतरराष्ट्रीय दर्जावर नेलं. त्यामुळे सलग दहा वर्षे कलमाडींना पुणेकरांना "हात' दिला. 2014 साली नरेंद्र मोदी यांची लाट आली. आणि त्या लाटेत अनिल शिरोळे निवडून आले. देशात अनेक भागात मतदारांनी अनपेक्षित कौल दिला आणि मोदी यांच्या हाती पूर्णबहुमत असलेले सरकार दिले. पण, काँग्रेस त्यानंतरच्या विधानसभेत काँग्रेसला पुण्यातील आठपैकी एकही विधान सभेची जागा मिळविता आली नाही. पाठोपाठ झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही सत्ता राखता आली नाही. कारण, गेल्या पाच वर्षांमध्ये पुण्यातील काँग्रेसची केडर पूर्ण मोडली आहे. पक्ष केवळ निवडून खासदार, आमदार आणि नगरसेवक यांच्यावर चालत नाही. तो चालतो कार्यकर्त्यांवर! काँग्रेसचं नेमकं याकडे दुर्लक्ष झालं आहे.

"एनएसयूआय', युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आघाडी, वेगवेगळ्या व्यवसायिकांच्या पक्षाच्या सेल, कामगारांमधील पक्षाची संघटना या सगळ्यांनी एका दिलाने आणि एका दिशेने निवडणुकीसाठी काम करायचे असते. पण, पुणे काँग्रेसमध्ये सध्या या सगळ्यांचीच तोंडं वेगवेगळ्या दिशांना आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्यात घुसून भाजपने काँग्रेसचा पराभव केल्यानंतरही सगळ्यांचे लक्ष फक्त दिल्लीतून कोणाचे नाव जाहीर होतंय त्याकडे आहे. मतदान जेमतेम महिन्याभरावर आल्यानंतर पुणे लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या आघाडीवर भीषण शांतता आहे. हे केडर मोडल्याचं स्पष्ट लक्षण आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com