Rahul Gandhi Pune : मला उमगलेला 'राहुल'

अशोक गव्हाणे
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

आज राहुलजींना नाही तर राहुलला नव्हे ठरवलेल्या पप्पू राहुलला जवळून अनुभवले आणि मी ऐकलेला पप्पू राहुल आणि आज उघड्या डोळ्यांनी बघितलेला राहुल यामध्ये खूप फरक आहे हे लक्षात आले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी खुला संवाद साधला. खरंतर आज राहुलजींना नाही तर राहुलला नव्हे ठरवलेल्या पप्पू राहुलला जवळून अनुभवले आणि मी ऐकलेला पप्पू राहुल आणि आज उघड्या डोळ्यांनी बघितलेला राहुल यामध्ये खूप फरक आहे हे लक्षात आले. बोलण्यात आवेष नाही. कटूता नाही, आक्रमकपणा तर अजिबात नाही. एकदम शांतपणे एका मर्यादेत राहुल गांधी विद्यार्थ्यांना उत्तरे देत होते आणि खरंतर इथेच माझ्यासोबत त्यांनी सर्वांना जिंकले.

राजकारणात धडे पावलापावलांवर असतात आणि हे नेहमीच कुठे ना कुठे चालूच राहते. मागच्यावेळी आपण जे शिकलो त्याचा वापर पुढे कसा करतो हे खरं तर महत्वाचे ! विरोधी पक्ष राहुलला ज्या पद्धतीने पप्पू बनविण्यात गुंतले आणि राहुल यांनी यांनी हाच नेमकेपणा हेरत पुढे पाऊल टाकले असावे. आज पाहिलेल्या राहुलकडे बघून तरी तो पप्पू वाटत नाही. उद्याचे सक्षम नेतृत्व करण्याची ताकद असलेला नेता वाटतो, कारणेही तशीच आहेत जो शिकला, तो नेता बनला; ज्याने चुका गिरवल्या, तो संपला. राहुल गांधी यांना अनुभवताना त्यांना ऐकताना हे कायम मनात होतं. कारण  भारतीय राजकारणात सर्वाधिक वैयक्तिक टीका सहन करणारा कोणी सध्या नेता असेल तर ते राहुल गांधी आहेत, हे नक्की !

पण राहुल गांधी खरेच कसे आहेत, हे अनुभवायला हवे तेव्हा कळते की,  राहुल मनमोकळे आहेत, अशासाठी की ते हजारो तरुणांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची धमक ठेवतात. ही धमक ठेवणे सोपी गोष्ट नक्कीच नाही. ते दिलखुलास आहे ते अशासाठी की, आताच्या घडीला, आताची वेळ ही पुढच्या पाच वर्षांसाठी निर्णायक असाताना उद्याचे भारताचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत आहेत, तरुणांच्या प्रश्नांना सामोरे जात आहेत ही गोष्टसुद्धा सोपी नाही ! खरं पहायला गेले तर, हा माणूस खूप वेगळा आहे हे प्रकर्षाने जाणवते. स्वतःची आजी आणि नंतर आपल्या बापाचा ज्या क्षेत्राने घात केला त्या क्षेत्राताच उतरायचे आणि आपली प्रतिमा बिघडवली जात असताना याच क्षेत्रात लढा देत उभे राहयचे हे करणे सोपे नाही, यासाठी वाघाचेच काळीज लागते आणि ते राहुलकडे नक्कीच आहे हे आता तरी स्पष्ट होत आहे. मी मोदींवर प्रेम करतो हे हाच माणूस सांगू शकतो, असे म्हटल्यावर ते माझ्यावर प्रेम करत नसतील तरीही माझी हरकत नाही असेही हाच माणूस सांगू शकतो, यावरून तरी हे स्पष्ट होते की, या माणसाच्या मनात कपट नाही. भारताच्या राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी आलेला हा माणूस आहे. 

आजही हा माणूस काही संवेदनशील प्रश्नांना सामोरे जाताना उत्तरे देतो की, मी अजूनही शिकतो आहे. मला तुमच्या सर्वांकडून शिकायचे आहे. माझ्या समोर उभी राहिलेली आव्हाने ही वास्तव होती आणि मी ते स्वीकारत गेलो, त्यातून बरंच काही शिकत गेलो. चांगले वाईट असले तरी वास्तव हे स्वीकारायला हवे आणि ते राहुलनीही स्वीकारले आणि इथेच राहुल वेगळे ठरतात. जेव्हा एअर स्ट्राईकसारख्या मुद्यांवर बोलायचे नाही हे ठरवलेले असातानासुद्धा पत्रकारांकडून आणि अन्य लोकांकडून जाणीवपूर्वक प्रश्न विचारले जातात. तेव्हा हा माणूस तेव्हड्याच ताकदीने सांगतो की, मला यावर राजकारण करायचे नाही आणि ही गोष्ट राहुल कीती सक्षम आहे हे सिद्ध करते. शेवटी राजकारणातही 60 हे वय निवृत्तीचे असावे असे सांगण्याची धमक ठेवणारादेखिल राहुल गांधी नावाचाच नेता आहे हे विसरून चालणार नाही.

साधारणपणे तासाभरासाठी अनुभवलले राहुल गांधी पाहिल्यास एक गोष्ट लक्षात येते की, हा माणूस राजकारणात टिकणार की नाही हे माहीत नाही पण भारताच्या राजकारणाला नवे वळण देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल यात तिळमात्र शंका नाही.

Web Title: Article on Rahul Gandhis Changing attitude towords Politics Written by Ashok Gavhane