भाजपपुढे आव्हान प्रतिमा उजळविण्याचे !

भाजपपुढे आव्हान प्रतिमा उजळविण्याचे !

उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन मोठी राज्ये भाजपला सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकतात. त्यापैकी महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरील मतभेद मिटवत भाजपने निवडणुकीपूर्वीच युती केली आहे. आता उरले कर्नाटक. या राज्यात हातून गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ राबवले. त्यामध्ये ते तोंडघशी पडले. ‘क्‍लीन पार्टी’ची प्रतिमा मलीन झाली. या पार्श्वभूमीवरच भाजप पुन्हा मैदानात उतरलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुबळीमध्ये प्रचाराचा नारळ फोडला. भाजपच्या नेत्यांचा कर्नाटकात राबता सुरू झालाय. चारच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य बेळगावात येऊन गेले. 

भाजप २००८ मध्ये पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने कर्नाटकात सत्तेत आला. त्यापूर्वी २००६ मध्ये जनता दलाशी युती करून भाजपने सत्तेची चव चाखली. त्या वेळी १८-१८ महिन्यांचे मुख्यमंत्रिपद उभय पक्षांनी वाटून घेतले; पण मुदत पूर्ण झाल्यानंतरही मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींनी पद सोडले नाही. त्यासाठी भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पांनी खूप खेळी खेळली. अखेर ते मुख्यमंत्री झाले औटघटकेचे. आठवडाभरातच कुमारस्वामींनी पाठिंबा काढून घेतला. २००८ च्या निवडणुकीत आपल्याला ‘धजद’ने फसवल्याची हाकाटी भाजपने पिटली. जनता दल आणि काँग्रेसचे आमदार फोडत १०४ जागांच्या जोरावर सत्ता संपादली. सरकार पाच वर्षे टिकले, पण भाजपचे तीन मुख्यमंत्री झाले. भूखंड घोटाळाप्रकरणी येडियुरप्पांना तुरुंगाची हवा खावी लागली. त्यानंतर डी. व्ही. सदानंद गौडा वर्षासाठी मुख्यमंत्री झाले. लिंगायत राजकारणातून उत्तर कर्नाटकातील हुबळीचे जगदीश शेट्टर मुख्यमंत्री झाले. 

२०१३ च्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी स्थिर सरकार दिले. २०१४ च्या निवडणुकीत लोकसभेच्या २८ पैकी भाजपला १७, काँग्रेसला ९ आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाला २ जागा मिळाल्या. लोकसभेच्या या निवडणुकीपूर्वी तीन महिने आधी काँग्रेस आणि ‘धजद’ची युती झाली. त्याकरिता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. नोव्हेंबरमधील पोटनिवडणुकांत या आघाडीने पुन्हा भाजपला धक्का दिला. लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या २ अशा ५ पैकी ४ जागा काँग्रेस-धजद आघाडीने जिंकल्या. 
मागच्या निवडणुकीत तीनही पक्ष वेगवेगळे लढले. लोकसभा निवडणुकीत पक्षीय पातळीबरोबरच जातीची समीकरणे निर्णायक ठरतील.

२०१४ चे बलाबल :

लोकसभेच्या एकूण जागा - २८ 
 भाजप - १७   काँग्रेस - ९  धजद - २ 

लिंगायत, वक्कलीग यांच्यासह अल्पसंख्याकांचा कौल महत्त्वाचा ठरेल. आता काँग्रेस आणि धजद युती झाल्यामुळे दलित आणि मुस्लिम या अल्पसंख्याक मतांचे विभाजन टळून त्याचा फायदा युतीला होऊ शकतो. जुने म्हैसूर म्हणजे म्हैसूर, तुमकूर, मंड्या, बंगळुरू, हसन या भागात ‘धजद’चा मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आहे. देवेगौडा हेही हासन येथील आहेत. जनता दलाला मानणारा वक्कलीग समाजही याच भागात आहे. काँग्रेस-धजद सत्तेवर असल्याने त्याचा फायदा उठवण्याचा ते प्रयत्न करतील. उत्तर कर्नाटकात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. ही भाजपची वोटबॅंक आहे. आता भाजपपुढे १७ जागा टिकवण्याचे आव्हान आहे. मंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा भाजप कसे करून घेते, हे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर ‘ऑपरेशन कमळ’मधून मलीन झालेली प्रतिमा उजळवण्याचेही आव्हान आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com