Loksabha 2019 : मला खासदार केलं पायजे... (संडे स्पेशल)

श्रेणिक नरदे
रविवार, 31 मार्च 2019

एप्रिल महिन्याचा पहिला दिवस हा गंमत करण्याचा, फिरकी घेण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. फिरकी घेण्याचे प्रकार या दिवशी सर्रास केले जातात. यातून स्वतःची आणि इतरांचीही करमणूक होते. अशाच काही घटना खास तुमच्यासाठी, वेगळ्या ढंगात, वेगळ्या शब्दांत, पोट धरून हसण्यासाठी... एवढेच! सर्वांचा आदर आणि मान राखूनच!

पार्लमेंटलमध्ये जर मी खासदार म्हणून गेलो आणि मत मांडलं की नोटा छापा, असं सगळे म्हणटले की नोटा छापत्यात... बहुमतानं नोटा छापायच्या आणि कर्जमाफी करायचीच! खालून टाळ्या वाजायला लागतात...

सकाळी-शिळोप्याची वेळ, ऊस जाऊन नांगर-रोटर झालेल्या रानात खोडवी गोळा करायला आलेल्या बायका, आढ्ढोळी पावसाच्या भीतीपोटी रानातला शाळू पाडायला, तर कुणी मळणी करायला आलेलं असल्यानं रानातनी तशी गर्दी असत्याचं. ही गर्दी तशी कलंगड, आइस्क्रीम, गारेगार विकणारी लोकं लक्षात ठेवून रानात जाऊन धंदा करायची. 

इलेक्षणाच्या शिझनात अशी गर्दी दिसली रं दिसली की मग शिवारभेट ही एक पिकनिकच असते उमेदवारासाठी. तर अशा ह्या रस्त्याकडच्या रानाजवळ अचानक पाच-सहा चारचाकी गाड्या, दहा-वीस फटफटी कचाकच येऊन थांबल्या. फटफटीवरचे निष्ठावंत कार्यकर्ते रस्त्यावरून रानात येऊन खोडवं वेचणाऱ्या, शाळू कापणाऱ्या, पाणी पाजणाऱ्या गड्याबायकास्नी हाका मारून, गोळा करून रानातल्याचं एका आंब्याच्या झाडाखाली आणतात. चारचाकी गाड्यांतून खासदारकीचे उमेदवार उतरतात, भावी आमदार, भावी झेडपी मेंबर, भावी सरपंच, भावी ग्रामपंचायत सदस्य हे सगळे लोक चारचाकीत असतात. तर तेही येऊन नमस्कार चमत्कार हुतो...

गावातला उत्साही निवेदक कार्यकर्ता म्हणतो, ‘‘...तर दादा परवाच त्या पार्टीतनं ह्या पार्टीत आल्यात आणि आल्या आल्या त्यांचं काम बघून पार्टीनं तिकीट बी दिलंय. आत्ता दादांना आपल्या आशीर्वादाची आणि मताची गरज हाय, तरी तुम्ही मतदान देऊन दादावर जुन्या पार्टीत झालेल्या आन्यायाचा बदला घेशीलाच अशी आशा व्यक्त करतो आणि दादांना विनंती करतो की, दादांनी आपलं म्हणनं मांडावं ही विनंती...!  

एवढ्यात मागून दोन कॅमेरा घेटलेले कार्यकर्ते उतरतात, ‘‘दादा आज सकाळपासून एक पण पोश्‍ट नही फेसबुकलाय जरा फोटो द्या आणि मग बोला...’’ 

दादा गॉगल काढून ठेवतो, नमस्काराची पोझ देतो, एक जग्गं अशी म्हातारी हुडकून तिला डोश्‍कीवर हात ठेवायला लावतो, तर म्हाताऱ्या बापूच्या हातून डब्यातील घास भरवून घेतानाचा फोटो घेतो, चेंबरावर पाणी पित असतानाचा फोटो घेतो. 
बास का? झक्कास आल्यात नव्हं? दे टाकूनशनी.... हिकडं ही जनता कटाळलेली...

जनतेचा वैताग बघून युवा नेतृत्व सावरून म्हणटलं, मी आत्ता खासदार झाल्यावर काय काय कामं करणार ते थोडक्‍यात सांगतो...
काय करणार?
करणार कायं तर....
मी शेतकऱ्याची कर्जमाफी करीन, सगळी सरसगट कर्जमाफ करणार कितीबी असूदे मग! वीजबिल्लं माफ करणार! पाणीपट्टी, शेतसारा, शिक्षण कर, उपसा कर निम्म्यावर आणणार! शेतमालाला अडीचपट हमीभाव मिळवून देणार!
हे कसं काय शक्‍य हाय? लोकं अडीचपट कसं काय देतील आम्हाला? 
लोकं कशाला द्यायला पायजे तवा? आपणच वाढवायचं. एवढी किंमत दिल्याशिवाय देतंच नही म्हणायचं...!
आणि दुसरं कुणी स्वस्तानी दिलं तर? 
तसं देऊ नये म्हणून कायदा करायचं, त्यासाठनं तर मला निवडूण द्यावं लागलं तुमाला. 
पण खासदारसाहेब समझाच, कर्जमाफ झालं नही, वीजबील माफ झालं नही, तर तुम्ही ते भरायची ग्यारंटी देतासा काय?
काय मामा असं कुठं असतंय का? शाटेलाइट पाडलं पुरावा द्या! कर्जमाफी देतो! ग्यारंटी द्या! असं प्रत्येक गोष्टीला ग्यारंटी नसत्या देता येत. ह्यासाठी मला खासदार केलं पायजे तरंच हे शक्‍य हाय!

तेवढ्यात ह्या मामाचाच यमपीएस्सी करणारा पोरगा उभा राहतो, हे असे यमपीएस्सी करणारे लोक इनशर्ट केल्यानेच अधिकारी दिसत असतात. डिशीप्लिनच्या नावावर कचकचीत टाईट्ट दिसत असतात, साधारणपणे अशा भावी अधिकाऱ्यांना हे नेते लोक टरकून असतात. तर हे रुबाबदार खोंड उठून उभा राह्यलं, आदबीनं नमस्कार केला आणि म्हणटला, सर तुमी जी कर्जमाफी देणारा त्याला पैशे कुठून आणनार? 
बॅंकेतंनं...
कुठल्या बॅंकेतंनं?
रिझ्रव बॅंकेतंनं...!
रिझर्व्ह बॅंकेत तर पैसा नहीच शिल्लक. 
पैसा नसाय काय झालं? मशनी हायीत की मशनी.
कसल्या मशनी?
नोटा छापायच्या मशनी...!
मग त्यचं काय?
पार्लमेंटलमध्ये जर मी खासदार म्हणून गेलो, आणि मत मांडलं की नोटा छापा, असं सगळे म्हणटले की नोटा छापत्यात. बहुमतानं नोटा छापायच्या आणि कर्जमाफी करायचीच...!

खालून टाळ्या वाजायला लागतात. दादांच्या नावाच्या घोषणांचा जयजयकार चालू होतो, एमपीयस्सीवाला गडी थकून जातो. खाली बसतो, त्याला ध्यानात येतंय आपला काय मेळ लागू देणार नही गडी...!

एक लक्षात ठेवा, बहुमत जर असलं की सगळं हुतंय बघा! तुम्ही ते मला देणारच्च हे मला माहीत हाय! त्यामुळं मी आपला लै येळ घेत नही. निघतो मी...! 

डीएसेलार कॅमेरे बॅगेत जातात, कार्यकर्ते फटफटीकडे धावतात, नेते गाडीत बुड टेकतात. 

एमपीएस्सीवाला मोबाईल चाळत बसलेला असतो, फेसबुकवरली पोस्ट त्याच्यासमोर येते. शिवारातील काळ्या मातीच्या लेकराचं स्वागत गावकऱ्यांनी केलं...

मायबापांचा मायेचा हात आहे, तरुणांची साथ आहे...! भाकरीतली अर्धी भाकरी देणारे मत का देणार नाहीत? अशा अनेक फेसबुक पोस्ट येत होत्या आणि त्यावर जमावही बिनधास्त लाईका, कमेंटा हाणतच सुटलाता.
हे असं जमायला पायजे आपल्यालाबी असा विचार करत इनशर्ट उसवत त्यानंही गाडीवर टांग टाकली...

एप्रिल महिन्याचा पहिला दिवस हा गंमत करण्याचा, फिरकी घेण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. फिरकी घेण्याचे प्रकार या दिवशी सर्रास केले जातात. यातून स्वतःची आणि इतरांचीही करमणूक होते. अशाच काही घटना खास तुमच्यासाठी, वेगळ्या ढंगात, वेगळ्या शब्दांत, पोट धरून हसण्यासाठी... एवढेच! सर्वांचा आदर आणि मान राखूनच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 MP Politics