Loksabha 2019 : ...गंगाकी लहर किसके संग!

प्रयागराज - ‘बोट पे चर्चा’ कार्यक्रमाच्या वेळी सोमवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा.
प्रयागराज - ‘बोट पे चर्चा’ कार्यक्रमाच्या वेळी सोमवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा.

उत्तर प्रदेशातील धार्मिकतेचे वातावरण आणि समाजाला भेडसावणाऱ्या समस्या यांची सांगड घालत मतदारांना आवाहन करण्याच्या हेतूने काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी सुरू केलेला जलमार्गावरील प्रचार लक्षवेधी, आगळावेगळा ठरणार आहे.

उत्तर प्रदेशात तुम्ही दोन घ्या, तुम्ही सात घ्या; असा कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या पद्धतीचा राजकीय खेळ समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष (सपा-बसपा) आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुरू आहे. आधी आघाडीने काँग्रेसला अमेठी व रायबरेली या राहुल व सोनिया गांधी खासदार असलेल्या जागा देऊ केल्या. नंतर उत्तर प्रदेश काँग्रेसने सपा, बसपा आणि अजित सिंग यांच्या लोकदलाला मिळून सात जागा सोडण्याचे औदार्य दाखवले. हे सगळे एकाचवेळी भाजपविरुद्ध आणि एकमेकांविरुद्ध लढणार असल्याने निवडणुकीच्या पाळण्यातला गोविंद-गोपाळ निव्वळ मनोरंजनाचाच भाग आहे. 

लोकसभा निवडणुकीतील ११ एप्रिल ते १९ मे या दरम्यान सातही टप्प्यांमध्ये मतदान होणारी राज्ये आहेत तीन. उत्तर प्रदेश, बिहार अन्‌ पश्‍चिम बंगाल. बिहार आणि प. बंगालच्या मिळून जागा ८२; एकट्या उत्तर प्रदेशच्या ऐंशी. त्यामुळेच ही राज्ये मोदींना पुन्हा सत्तेवर येण्यासाठी महत्त्वाची. त्यांना मदत होईल ती हिंदुत्त्ववाद्यांमध्ये लोकप्रिय योगी आदित्यनाथांची. गेल्या दहा-बारा दिवसांतील निरीक्षणे सांगताहेत, की उत्तर प्रदेशात हलकी का होईना मोदींची लाट आहे. अर्थात, ती विरोधकांची धुळधाण उडवण्याइतकी ताकदवान नाही. भाजपपुढे बसपा-सपा आघाडीचे आव्हान आहे. अलीकडच्या पोटनिवडणुकांमध्ये ते आपापली मते एकमेकांकडे वळू शकतात, हे स्पष्ट झाल्याने भाजपपुढील आव्हान आणखीनच अवघड बनलंय. राज्याच्या पातळीवर २००९ मध्ये २१ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचा प्रयत्न या भाजप विरुद्ध महागठबंधन अशा लढतीमधून किमान दोन आकडी खासदार निवडून आणण्याचा आहे. 

गंगा की लहर प्रियांका
काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधींनी गेल्या आठवड्यात गुजरातच्या गांधीनगरमध्ये भाषण दिले. ते अत्यंत छोटे होते. परंतु भाई और बहनोंऐवजी ‘मेरी बहनों और भाईओं’ इथपासून कोणताही वेगळा आव, अभिनिवेश न आणता शांतपणे थेट बेरोजगारी वगैरे मुद्यांवर भर देणारे होते. त्याची देशभर चर्चा असतानाच प्रियांका प्रयागराज म्हणजे आधीचे अलाहाबाद ते वाराणसी अशा गंगा प्रवासाला निघाल्यात. ‘गंगा की लहर प्रियांका’ या हॅशटॅगने सोशल मीडियावर गंगाप्रवासाचा प्रचार सुरू झालाय.

मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा हा जलमार्ग आहे. प्रयागराजमधील गंगा-यमुना संगमावरच्या छतनाग घाटापासून त्यांचा हा १४० किलोमीटरचा, तीन दिवसांचा प्रवास सोमवारी सुरू झालाय. तो बुधवारी वाराणसीच्या अस्सी घाटावर संपेल. जगभरातील पर्यटकांना या जलमार्गावरचा गंगा क्रूझ परिचित आहे आणि ते पर्यटनाचे मोठे आकर्षणही आहे. राजकीय प्रचार स्टीमर बोटीतून करण्याचा प्रियांकांचा फंडा पहिलाच आहे. जिथून हा प्रवास सुरू झाला आणि जिथे संपणार, ती दोन्ही ठिकाणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहेत. प्रयागराजचा अर्धकुंभ योगी आदित्यनाथ यांनी ग्लोबल इव्हेंट बनवला, त्यातून राजकीय लाभाचा प्रयत्न केला. वाराणसी हा तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच मतदारसंघ. म्हणजे प्रियांका यांचे राजकीय लक्ष्य निश्‍चित आहे. जातीपातीच्या राजकारणाची परिसीमा ठरावी, अशा उत्तर प्रदेशात भाजपची मदार उच्चवर्णीय हिंदू मतांवर आहे. त्याला छेद देण्यासाठी प्रियांकांचा बोटीतून गंगाप्रवास आहे. जागोजागीच्या भाषणातील मुद्दे भलेही हिंदुत्त्ववादाचे नसतील. बहुतेक ते बेरोजगारीचे प्रश्‍न, भाजपमधील मागास जातींची घुसमट हेच असतील. भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या खासदार सावित्रीबाई फुले यांना सोबत घेऊन प्रियांकांच्या प्रवासाला सुरवात ही बाब त्यादृष्टीने बोलकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com