Loksabha 2019 : व्हाॅट्‌सॲप निवडणूक!

Social-Media
Social-Media

प्रचारयंत्रणेच्या तंत्रात तंत्रज्ञानाने आमूलाग्र क्रांती केली आहे. समाजमाध्यमातून घातले जाणारे रतीब, पाठवलेली माहिती हेच अंतिम सत्य मानून त्यावर मत बनवणे वाढले आहे. समाजमाध्यमांनी परदेशांतही क्रांती घडवून आणली आहे, हे लक्षात घेऊनच प्रचारप्रक्रियेत त्याचा वाढलेला अपरिमीत वापर डिसिजनमेकर ते डिसिजनचेंजर अशी भूमिका पार पाडत आहे...

सन २०१४ मध्ये देशातील बरेच काही बदलले. सरकार बदललेच; पण येथील निवडणुकीचे स्वरूपदेखील. महत्त्वाचा बदल आहे तो प्रचाराच्या पद्धतीत. सत्तर वर्षांत या देशात काहीच झाले नाही म्हटले, तरी येथे इंटरनेट आणि स्मार्ट दूरध्वनी आले. परंपरेनुसार त्यातही ‘टूजी’सारखा घोटाळा वगैरे केला हे खरे. तरीही ते स्पेक्‍ट्रम आपल्या कामी आलेच. मग हलके आणि स्वस्त मोबाईल दूरध्वनी बाजारात ओतले गेले. अनेकांच्या हातात मोबाईल दिसू लागले. या बदलांचा पहिला फटका बसला मुख्य प्रवाहातील माध्यमांना.

आतापर्यंत माहितीचे पाटबंधारे त्यांच्याच हाती होते; पण संगणक आणि मोबाईलवरील फेसबुक, ट्विटर इत्यादी समाजमाध्यमांनी ती बारी फोडली. लोकांस माहितीस्वतंत्र आणि संपन्न झाल्यासारखे वाटू लागले त्यामुळे. त्या तथाकथित माहितीस्वतंत्र वातावरणात २०१४ चा निवडणूक प्रचार झाला. बराक ओबामांनी तिकडे अमेरिकेत ब्लॅकबेरी प्रचाराचा ओनामा घालून दिला होताच. आपल्याकडे आम आदमी पक्ष (आप) आणि भारतीय जनता पक्षाने त्यांचा कित्ता गिरवला. 

२०१४ मध्ये आणखी एक घटना घडली. तब्बल १९०० कोटी रुपये मोजून ‘फेसबुक’ने व्हॉट्‌सॲप खरेदिले. आज १८० देशांतील सुमारे १५० कोटी लोक या निरोप्याचा वापर करताहेत आणि त्यातील ३० कोटी भारतातील आहेत. १३० कोटींच्या भारतात हे प्रमाण कमीच. पण मतदारसंख्येशी ते ताडून पाहता त्याचा विस्तार लक्षात येतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार होते ८३ कोटी. मतदान करणारे होते सुमारे ५५ कोटी. ही संख्या यंदा वाढेल. नवमतदार लक्षणीय असतील. एक मात्र नक्की, की हे सगळे व्हॉट्‌सॲपधारी असतील. ते अधिक तंत्रस्नेही असतातच, त्यामुळे जुन्या पिढीपेक्षा अधिक ‘माहितीदार’ही असतात. कुटुंबाचे, मित्रांचे मत ते प्रभावित करू शकतात. 

सेलफोन प्रमुखांची फौज
अनेक गोष्टींप्रमाणेच यातही आघाडीवर आहे तो भाजप. गेल्या काही निवडणुकांत भाजपने ‘पन्नाप्रमुख’ नामक संकल्पना राबविली होती. या वेळी भाजप राबवत आहे सेलफोन प्रमुख ही अभिनव संकल्पना. देशातील नऊ लाख २७ हजार ५३३ मतदान केंद्र वा बूथवर प्रत्येकी एक अशा सुमारे नऊ लाख सेलफोन प्रमुखांची फौज या वेळी भाजपच्या छावणीत असेल. याबाबत प्रसिद्ध वृत्तांनुसार, या सेलफोन प्रमुखाचे काम असेल प्रत्येक मतदान केंद्रनिहाय तीन व्हॉट्‌सॲप ग्रुप बनविण्याचे. २५६ सदस्य ही ग्रुपची मर्यादा.

त्यात अर्थातच वाट्टेल त्याचा समावेश नसेल. ते कदाचित जातनिहाय, व्यवसायनिहाय असतील; पण त्या-त्या मतदान केंद्रातील मतदारांच्या ‘डेटा’ची छाननी करूनच ते बनवलेले असतील. हे करण्याचे कारण म्हणजे, त्या-त्या गटातील सदस्यांच्या वैचारिक उंचीपासून आर्थिक क्षमतेपर्यंतच्या विविध बाबी लक्षात घेऊनच, त्यांना कोणत्या प्रकारचा प्रचार खिलवायचा, हे ठरवता येते. ‘केंब्रिज ॲनालिटिका’ने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्यक्तीलक्ष्यी प्रचार केला, त्याचाच हा स्वदेशी अवतार. अर्थात, हे केवळ भाजपच करीत आहे आणि अन्य पक्ष धुतल्या तांदळासारखे आहेत असे नाही. येथे सगळे एकाच माळेचे मणी. समाजमाध्यमांद्वारे मतदारवर्तन बदलण्याच्या, लोकभावना वळविण्याच्या प्रचारक्रीडेत सारेच सहभागी आहेत. 

घरातील लोक दूर, बाहेरचे जवळ
या सगळ्याच समाजमाध्यमांची खासीयत आहे. त्यांनी माहितीवरील मक्तेदारी मोडून काढून नवी माहिती-लोकशाही प्रस्थापित केली. खरेतर समाजमाध्यमांनी घरातील लोक दूर केले आणि बाहेरचे जवळ आणले. तेही जवळ आले ते समान-मतधारीच. समाजमाध्यमांतून त्यांचीच पडसादगृहे (इकोचेंबर) निर्माण झाले. आपल्याहून वेगळी मते असलेल्यांना गटात वा मित्र-यादीत समाविष्ट करायचेच नाही आणि असे कोणी आलेच तर त्यांचा शब्दछळ करायचा, अशी रीतच बनली. हे सारे राजकीय प्रोपगंडा करणाऱ्यांच्या सोयीचेच होते. विशिष्ट मते वा धारणा असणारांना ती मते वा धारणा यांना अनुकूल वा त्या पक्‍क्‍या करणारा मजकूरच भावतो. त्यांच्यावर तशाच प्रकारच्या मजकुराचा, जाहिरातींचा, प्रचाराचा मारा करून त्यांचे मतदार म्हणून वर्तन हवे तसे वळवणे शक्‍य असते. असा प्रचारप्रकार २०१४ मध्ये फेसबुकी पानांतून होता, यंदा पाळी आहे व्हॉट्‌सॲपची. 

वेगळेपण व्हॉट्‌सॲपचे
एकतर हे ॲप बहुमाध्यमी आहे. लिखित मजकूर, छायाचित्रे, ध्वनी आणि चित्रफिती असे सगळे यातून पाठवता येते. शिवाय, ते ‘एंड टू एंड एन्क्रिप्टेड’ असल्याने तो संदेश अगदी व्हॉट्‌सॲप कंपनीलाही वाचता येत नाही. (निदान तसे सांगितले जाते.) त्यामुळे त्यावरून ‘काहीही’ धाडले जाऊ शकते. या काहीहीत सुप्रभातच्या संदेशांसह बनावटवृत्ते आणि फोटोशॉप छायाचित्रेही. काही वर्षांपासून आपण अशा प्रकारचा राजकीय- धार्मिक प्रोपगंडा वाचतो, पाहतोच आहोत. पण त्या चित्रफिती, ते विनोद, ते मीम्स, त्या ‘मीडिया आपको यह नही बताएगा’ म्हणत येणाऱ्या फेकन्यूज, ते ‘नासा’चे आणि ‘युनो’चे भारताच्या विश्वगुरुत्वाबाबतचे पुरावे हे सारे जोवर आपल्या धारणांना अनुकूल असते, तोवर ते आपण लगेच पुढेही पसरवतो. आपल्याला ही जाणीवच नसते, की हे सारे बनविणारा मोठा उद्योग देशात उभा राहिलेला आहे. 

या उद्योगाने माहितीची पारंपरिक साधने अविश्वासार्ह ठरविली, त्याला ही साधनेही तेवढीच जबाबदार आहेत, हे नाकारता येत नाही. निवडणूक काळात पण्यवृत्तांचे शोकपर्व लोकांना समजत नसते असे नाही. अशा गैरप्रकारांमुळे, सनसनाटीकरणाच्या नादामुळे मुख्य प्रवाहातील माध्यमांनी आणि त्यातही वृत्तवाहिन्यांनी आपल्या विश्वासार्हतेला आपणच नख लावले.

समाजमाध्यमांनी त्याची खिल्ली उडविली, त्यावर टीका केली, पत्रकारांची वृत्तवारांगना म्हणून संभावना केली आणि नंतर आपणच त्या विश्वासार्हतेचे वाहक असल्याची दवंडी पिटवली. परिणाम काय? तथ्यांनाच खोटे ठरवले जाऊ लागले. हॅशटॅगमधून दिसेल, तीच वस्तुस्थिती असे मानण्यात येऊ लागले. सत्योत्तरी सत्याच्या जमान्यात आपण कधी येऊन पोचलो ते आपल्यालाही समजले नाही. आज नेते ‘इन्फ्लुएन्सर’ बनले आहेत. ते भरवताहेत तोच विचार आपण पचवतो आहोत आणि त्यातून तयार होणारी मते आपलीच आहेत, असे मानत आहोत. येऊ घातलेली व्हॉट्‌सॲप निवडणूक हा त्या प्रवासातील केवळ एक थांबा आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com