Rahul Gandhi Pune : पप्पू अब पप्पू नही रहा !

सम्राट फडणीस
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

लोकांमध्ये थेट मिसळण्यानं लोकांना नेता आपलासा वाटू लागतो. कधी गरीबाच्या झोपडीत, कधी विद्यार्थ्यांत, कधी शेतकऱयाच्या घरात असं राहूल यांनी गुजरात निवडणुकीपासून लोकांमध्ये मिसळणं सुरू केलं. नेता 'ऍक्‍सेसिबल' आहे, ही प्रतिमा राहुल यांनी पोहोचवायला सुरूवात केली. 

राहूल गांधींनी आज पुण्यात रोड शो न करता कॉलेज मुलांशी संवाद का साधला? रोड शोमुळं राहूल अधिक जनतेपर्यंत पोहचू शकले नसते का?... 

मित्रानं प्रश्न विचारले. त्यानंतर काही संवाद झाला. त्यालाच काही प्रश्न विचारत गेले. राहूलची नवी प्रतिमा उलगडत गेली. 

हा संवाद असाः 
'रोड शो करून काय झालं असतं?' 
- अधिक लोकांपर्यंत तो पोहचू शकला असता की... 
'रोड शोमध्ये तो लोकांच्या किती जवळ जाऊ शकला असता...?' 
- हा...ते शक्‍य नव्हतं. 
'कॉलेजची मुलं कुठला मीडिया सर्वाधिक वापरतात?' 
- सोशल मीडिया 
'कॉलेजची मुलं मत कशावरून बनवितात?' 
- सोशल मीडियावरून 
'सभा आणि रॅम्प यामध्ये फरक काय राहतो?' 
- सभेला मोठा 'डी' आहे. 100 फुट लांब जनता बसते. रॅम्पवरून 10 फुटांवरच्या लोकांशी थेट बोलता येते. 

शेवटच्या प्रश्नात राहूल ज्या पद्धतीने स्वतःची प्रतिमा तयार करतोय, त्याचे गुपित आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. त्यांना सर्वोच्च सुरक्षा आहे. ती अत्यंत योग्य आहे. अशा नेत्यांना लोकांमध्ये सहज मिसळणे अशक्‍य बनते. जनता सभांना गर्दी जरूर करते. पण, 200 मीटवरून मोदींचा फक्त आवाज ऐकू येतो. जवळच्या स्क्रिनवर मोदींचा फक्त चेहरा दिसतो. सर्वोच्च पद नकळत नेत्याला जनतेपासून दूर सारतं. जाहीर सभा अत्यंत काटेकोर बनवाव्या लागतात. कालांतराने याच सभा नेत्याचा कमकुवतपणा बनतो. 

राहूल यांनी नेमक्‍या याच कमकुवतपणावर गेले दोन वर्षे हल्ला चढविला. लोकांमध्ये थेट मिसळण्यानं लोकांना नेता आपलासा वाटू लागतो. कधी गरीबाच्या झोपडीत, कधी विद्यार्थ्यांत, कधी शेतकऱयाच्या घरात असं राहूल यांनी गुजरात निवडणुकीपासून लोकांमध्ये मिसळणं सुरू केलं. नेता 'ऍक्‍सेसिबल' आहे, ही प्रतिमा त्यांनी पोहोचवायला सुरूवात केली. 

जसं लोकांशी थेट बोलणं सुरू केलं, तसंच मीडियाशी थेट भीडणंही. मोदींवर तेही बंधन आहे. मोदींनी मीडियापासून स्वतःला दूर ठेवलं. पत्रकार परिषद बंद करून टाकल्या. आधी त्याचा जयजयकार झाला. मात्र, हळू हळू या निर्णयाभोवतीही संशयाचं जाळं निर्माण झालं. कोणीही अडचणीचे प्रश्न विचारू नयेत, म्हणून मोदींनी पत्रकार परिषदा बंद केल्या, हा आरोप झाला. आजही होतो आहे. राहूल यांनी मीडियाशी शक्‍य तिथं भिडण्याचं ठरवूनही आता वर्ष होऊन गेलंय. 

मीडिया भाजपने विकत घेतला, असा आरोप कॉंग्रेसमधून सातत्याने होत असतो. विकत घेतला असेल किंवा नसेल, मीडियामध्ये सारासार विचार करणारी मंडळीही आहेतच. कुठल्याही प्रश्नांना राहूल बिनदिक्कत सामोरे जायला लागले. राहूलकडून कुणाच्याच काही अपेक्षा नव्हत्या; त्यामुळं एका बाजूला मोदींचा माहितीवर पोलादी पडदा आणि दुसऱया बाजूला राहूल यांचा अघळपघळ मोकळेपणा यांच्यात अपरिहार्यपणे तुलना झाली. गेल्या वर्षभरातला मीडियाचा ट्रेंड पाहिला, तरी तुला कुणाच्या बाजूने झुकायला लागली, हे स्पष्ट दिसते. 

थेट लोकांमध्ये मिसळणारा आणि कोणताही आडपडदा न ठेवणारा नेता, अशी नवी ओळख राहूल यांनी तयार केली. मोदी यांची करडी, कडवी प्रतिमा आणि राहूल यांचा साधेपणा, बिनधास्तपणा यामध्ये तरूणाईला काय भावते, हे राहूल यांच्या टॉक शोंनंतरची मुलांची भावना सांगून जाते. मोदी वाईट नाहीत, पण राहूल म्हणजे फक्त पप्पूच नव्हे, हा मेसेज यापेक्षा अधिक प्रभावीपणे पोहोचविता आला नसता. 

खांद्यावर डोकं ठेवून रडणाऱया शेतकऱयाला थोपटणारा आणि पुण्यात आज विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अँकर्ससोबत सेल्फी घेणारा हे दोन्ही राहूल एकच आहेत. 'मी तुमचा द्वेष नाही करत...,' असं मोदींच्या गळ्यात भर लोकसभेत पडून सांगणाऱया राहूलला पप्पू ठरवायचा प्रयत्न पुष्कळ झाला. हाच पप्पू आता बापाला खेळवतोय आणि बाप त्याच्या 'नॅरेटिव्ह'ला सोडून पाकिस्तानsssपाकिस्तानsss म्हणून ओरडतोय. कसलेल्या नेत्याला स्वतःचं 'नॅरेटिव्ह' विसरायला लावण्याइतकी समज राहूलमध्ये आली आहे आणि पप्पू अब पप्पू नही रहा, हे समजण्याइतकी भारतीय जनता हुशार आहे. 

Web Title: Loksabha Elections Why Rahul Gandhi Interacts With Students In Pune