Loksabha 2019: महाराष्ट्रात मोदींचे कार्पेट बॉम्बिंग

मृणालिनी नानिवडेकर
सोमवार, 1 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचार अभियानाला प्रारंभ करण्यासाठी निवड केली ती गांधीजींची कर्मभूमी असलेल्या वर्ध्याची. स्वच्छता अभियानाचा मुददा हातात धरून आजच्या सभेत त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसवर हल्ला चढवला.
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचार अभियानाला प्रारंभ करण्यासाठी निवड केली ती गांधीजींची कर्मभूमी असलेल्या वर्ध्याची. स्वच्छता अभियानाचा मुददा हातात धरून आजच्या सभेत त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसवर हल्ला चढवला.

महाराष्ट्रातून एकाही जागेवर त्यांना विजयी करू नका हे आवाहन करताना त्यांनी (नाक्‍यावरचे शब्द वापरायचे तर) या दोन्ही पक्षांची धुलाई केली. लोकसभेची निवडणूक मोदी शहा यांच्या जोडगोळी राष्ट्रवादाशी जोडली होती ,ती त्यांनी प्रथमच हिंदुत्ववादाशी जोडली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग वापरला तो जयपूर कॉंग्रेस अधिवेशनात. आज सोलापुरमध्ये ते अस्तित्वाची लढाई लढत असताना थेट पंतप्रधानानी जुने संदर्भ वापरत टीका करणे हे कॉंग्रेसच्या नेत्यालाच नव्हे तर संपूर्ण चमूला हतोत्साहित करणारे आहे. मोदींना तेच अपेक्षित असावे.

आज महाराष्ट्रातल्या पहिल्याच सभेत मोदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही थेट हल्ला चढवला. प्रादेशिक पक्षांवर त्या त्या भागात पोहोचल्यावर पंतप्रधान टीका करणार हे स्पष्ट आहे.

कॉंग्रेसपेक्षाही या प्रादेशिक पक्षांची खासदारसंख्या जास्त ठरण्याची शक्‍यता असल्याने ते तोफ या छोटया मंडळींकडेही वळवणार हे स्पष्ट आहे. मात्र तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसवर केलेल्या टिकेचे आयाम वेगळे आहेत. शरद पवार हे केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षच नव्हेत तर ते राष्ट्रीय राजकारणात महत्वाची व्यक्‍ती मानली जातात. ते आपले आदरणीय असल्याचे मोदी आजवर वारंवार स्पष्ट करत असत. त्यांना राजकीय हवेचा अंदाज येतो असा उल्लेख मोदींनी यापूर्वी आदरपूर्वक केला होता. आज वर्ध्यात महाराष्ट्रातल्या पहिल्या सभेत त्यांनी पवारांना राजकीय हवा लक्षात आली आणि त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असा आपल्याच वाक्‍यात कालानुरूप बदल केला. पूर्वीचा गौरवपूर्ण उल्लेख बदलून ते आज टीका करायला सरसावले. ही भूमिका मतदानापर्यंतची आहे की नंतरचीही ते 23 मे च्या निकालानंतर कळेल. पण ज्या बारामतीत मोदी स्वत: पवारांची स्तुती करण्यासाठी गेले होते तेथे ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जाणार आहेत.

सुप्रियाताई सुळे यांच्याविरोधात मोदींची प्रचारसभा असेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पवारविरोधक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे समर्थक असे काहीसे विरोधाभासी चित्र जनतेच्या मनात होते. त्यात बदल करण्याची वेळ मोदींच्या निर्णयांवरून आलेली दिसते.
 

पवारांनी कृषी खाते सांभाळताना शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही अशी टीका तर केली आहेच शिवाय मावळ येथे शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश पवार कुटुंबाने दिले अशी आक्रमक भाषाही आज वापरली आहे. या कुटुंबात कलह आहे अन पवार त्यांच्या पुतण्यासमोर निष्प्रभ ठरले अन रिेंगणातून माघार घेते झाले असेही मोदी बोलले. महाराष्ट्राच्या राजकारणात या विधानांचे पडसदा येत्या काही दिवसात उमटत रहातील.आमचे सरकार प्रयत्न करते आहे ,सिंचनाला निधी देते आहे मात्र 70 वर्षांची अनास्था कशी या काळात भरून काढणार असा उल्लेखही त्यांनी केला. मोदींनी जलयुक्‍त शिवार मोहिमेचे कौतुक केले खरे पण त्यांचा भर गेल्या राजवटीतल्या गैरकृत्यांचा पाढा वाचण्यावर होता. सिंचन घोटाळा, स्टॅम्प घोटाळा अशी जुनी बहुचर्चित प्रकरणे त्यांनी काढली. निवडणूक विकासाच्या अजेंडयावर लढायची आहे की कॉंग्रेसविरोधावर ते येत्या काही दिवसात कळेल. मोदींवर जनतेचा आजही विश्‍वास असावा. वेगवेगळ्या पहाण्या त्यांच्यावर नाराज असलेली जनताही अपेक्षा तेच पूर्ण करतील अशी आशा बाळगून आहे. गेल्या निवडणुकीत 48 लोकसभा मतदारसंघांपैकी तब्बल 42 जागा जिंकून देणाऱ्या महाराष्ट्राकडून भाजपला अपेक्षा आहेत.ते स्वाभाविक आहे. त्यासाठी मोदी कार्पेट बॉम्बींग करणार याची चुणूक त्यांच्या पहिल्या भाषणाने दाखवली.

महाराष्ट्राची परिस्थिती पाच वर्षांपूर्वीसारखी नाही हे लक्षात घेत मोदींनी थेट हल्ल्याला प्रारंभ केलेला दिसतो. कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसची निवडणूक तयारी उत्तम आहे असे सांगितले जाते. ते लक्षात घेतच मोदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करण्यात भाषणाचा अधिक वेळ घालवला. गोंदयिात ते पुन्हा येत आहेतच. बालाकोटचे कार्पेट बॉम्बिंग आटोपले, निवडणुकीचे सुरू झाले. महाराष्ट्रातली सुरूवात झाली आता पुढे काय होते ते पहायचे.

Web Title: Mrunalini Naniwadekars Article About Modis Carpet bombing In Maharastra