Loksabha 2019 : आता हीच जाहिरातबाजी मोदींच्या अंगलट?

कृपादान आवळे
सोमवार, 8 एप्रिल 2019

- नरेंद्र मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेली काही आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत

- मग आता त्याच मुद्यांवरून विरोधकांकडून जाहिरातबाजीच्या माध्यमातून टीका केली जातेय

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय होऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार स्थापन झाले. या विजयाचे प्रमुख कारण म्हणजे पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची राजकीय 'स्ट्रॅटेजी'. मोदी-शहा या जोडगोळीने लोकसभेनंतर देशातील विविध राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे मुख्य कारण म्हणजे जाहिरातबाजी. 

मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी जाहिरातबाजी करून विविध प्रलोभने, आश्वासने देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मोदींचा हा प्रयत्न यशस्वीही झाला. त्यावेळी 'मोदी लाट' देशभर पसरली होती. मोदींनी जाहिरातबाजीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार किंबहुना काँग्रेसवर विविध आरोप केले होते. जाहिरातबाजी करताना भाजपने मतदारांच्या ज्वलंत प्रश्नांवर अचूक नेम साधत आश्वासनांची जणू खैरातच केली होती. मग यामध्ये बेरोजगार तरुणांना नोकऱ्या, परदेशी बँकांमध्ये असणारा काळा पैसा बाहेर काढणे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे याशिवाय प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देणे, यांसारख्या विविध मुद्द्यांवर त्यांनी आश्वासने दिली होती. मात्र, आता मोदी सरकारची पाच वर्षे पूर्ण होत आहेत, तरीदेखील यांपैकी काही आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारासमोर सामोरे जाताना मोदींकडे मुद्दाच नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक' आणि हवाई दलाने केलेल्या 'एअर स्ट्राईक'चे उदाहरणे देऊन मतांचा जोगवा मागताना मोदी फिरत आहेत.

मग, आता मूळ मुद्दा येतो तो म्हणजे त्याच जाहिरातींच्या आश्वासनांचा. मोदींनी दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने विरोधकांना आयते कोलीतच मिळाले आहे. आता मोदींच्याच जाहिराती पुन्हा ऐकवून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करत आम्हाला पुन्हा संध्या द्या, अशी मागणी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला तशी अजून सुरवातही झाली नाही. तरीदेखील विरोधकांकडून मोदींवर त्यांनी केलेल्या जाहिरातबाजीचे उदाहरण देत आश्वासनांची खिल्ली उडवली जात आहे. तसेच तशा स्वरुपाच्या जाहिरातीही प्रसिद्ध होत आहेत.

मोदींना आणि भाजपला सत्ता मिळवून देण्याचे प्रमुख माध्यम टीव्ही आणि सोशल मीडिया. या माध्यमातही मोदींच्या आश्वासनांची खिल्ली उडवणारी जाहिराती सध्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता विरोधकांना मोदी आणि भाजपवर टीका करण्यासाठी आणखी कोणत्या मुद्द्यांची गरज भासत नाहीये. जर मोदींनी दिलेली आश्वासनं या पाच वर्षांच्या कालावधीत पूर्ण केली असती, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. पण मोदींनी दिलेल्या आश्वासनांची आता त्यांनाच तर भीती वाटत नसेल ना? असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा जाहिरातबाजी कामी येते, की जाहिरात विरोधी जाहिरातबाजी हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Web Title: Opposition Partys Advertisment might be affect on Election Campaign of BJP