Loksabha 2019 : पुण्यातील लढाई 'नुरा कुस्ती' की 'लुटूपूटू'ची

उमेश शेळके
मंगळवार, 2 एप्रिल 2019

- निष्ठावान की बाहेरचा यावरून कॉंग्रेस पक्षात सुरू असलेला संघर्ष अखेर संपला
- पुण्यासारख्या शहरात पक्षाला पुन्हा गतवैभव मिळून देण्याचे मोठे आव्हान
- भाजपचे उमेदवार गिरीश बापट आणि जोशी यांचे मैत्रीचे संबंध सर्वश्रुत
- बापट विरुद्ध जोशी ही "नूरा कुस्ती' की "लूटूपूटी" लढाई

निष्ठावान की बाहेरचा यावरून कॉंग्रेस पक्षात सुरू असलेला संघर्ष अखेर संपला. माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी देऊन पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला. त्यामुळे उमेदवारीचा प्रश्‍न मिटला, परंतु विजयश्री खेचून आणणे आणि पुण्यासारख्या शहरात पक्षाला पुन्हा गतवैभव मिळून देण्याचे मोठे आव्हान निष्ठावंत जोशी यांच्यापुढे उभे आहे. ते आव्हान जोशी कसे पेलणार. भाजपचे उमेदवार व पालकमंत्री गिरीश बापट आणि जोशी यांचे मैत्रीचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे बापट विरुद्ध जोशी ही "नूरा कुस्ती' पुणेकरांना पहावयास मिळणार की "लूटूपूटी" लढाई होणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे. 

एकेकाळी पुणे हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र काळाच्या ओघात कॉंग्रेसकडून संघटनेकडे दुर्लक्ष झाले. त्यातच 1999 मध्ये कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेस अस्तित्वात आली. तेव्हापासून कॉंग्रेसला घरघर लागली, ती घरघर आजपर्यंत कोणी थांबू शकले नाही. पुणे महापालिकेवर एकहाती सत्ता असलेल्या कॉंग्रेसला 2002 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आव्हान उभे राहिले. तेथून पक्षाचा पडता काळ सुरू झाला. 2007 मध्ये भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्रित येत खासदार सुरेश कलमाडी यांना बाजूला ठेवण्यासाठी पुणे पॅटर्न अस्तित्वात आणला. तेथूनच शहरातील कॉंग्रेस दुबळी होऊ लागली. 

कॉमनवेल्थ गेम्स मधील गैरकारभारावरून खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि शहरातील कॉंग्रेसची पीछेहाट सुरू झाली. कलमाडी यांच्यानंतर कोण असे अनेकदा प्रश्‍न उपस्थित झाला. परंतु त्यांचे उत्तर शेवटपर्यंत मिळू शकले नाही. प्रदेश कॉंग्रेसकडून पुणे शहरात पक्षाचे नेतृत्व उभे राहील, असे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. परिणामी पुणे शहरात कॉंग्रेसकडे एकमुखी नेतृत्व उभे राहू शकले नाही. उलट गटबाजीचा सुळसुळाट झाला आणि स्वतंत्र सुभेदारी सुरू झाली. कोणीच कोणाचे ऐकेनासे झाले. एकसंध कॉंग्रेस बांधून ठेवणारे नेतृत्व नसल्यामुळे कॉंग्रेसची ही बिकट अवस्था झाली.

पक्षाकडून सामूहिक नेतृत्वाचा प्रयत्न झाला. परंतु तोही फसला. भाजपकडे गिरीश बापट, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित पवार यांच्या एकहाती नेतृत्वामुळे या पक्षांचा आलेख नेहमीच चढता राहिला. परंतु तसे कॉंग्रेसमध्ये झाले नाही. मध्यंतरी विश्‍वजित कदम यांच्या रूपाने प्रयत्न झाले. परंतु पक्षातील गटबाजीला कंटाळून त्यांनी देखील काढता पाय घेतला. 

त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत पक्षापुढे उमेदवारीचा पेच निर्माण झाला. पक्षाकडे सक्षम नेतृत्व नसल्यामुळेच खासदार संजय काकडे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड यांची नावे देखील चर्चेत आली. त्यातून बाहेरचे विरुद्ध निष्ठावंत असा संघर्ष उभा राहिला. परिणामी उमेदवार जाहीर करण्यात पक्षाला वेळ लागला आहे. आता हा वाद मिटला असला, तरी पक्षाकडे विजयश्री खेचून आणणे आणि पुन्हा गतवैभव मिळून देण्याचे आव्हान उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांपुढे आहे. हे शिवधनुष्य कोण उचलणार या प्रश्‍नाचे उत्तर मात्र कोणीच देऊ शकत नाही.

Web Title: Umesh Write an Article about Pune loksabha Election