Loksabha 2019: मनोरजंक वाद "मै भी चौकीदार"

विजय नाईक
सोमवार, 1 एप्रिल 2019

- देशात "चौकीदार" शब्दावरून बरंच वादळ
- "मै भी चौकीदार" असे ट्‌विटर हॅन्डल तयार करून त्यावरून चौफेर बॅटिंग
- मोदी सत्तेवर येण्यापूर्वी निवडणूक प्रचारात "चायवाला" या शब्दावरून वादंग

नवी दिल्ली : सध्या देशात "चौकीदार" शब्दावरून बरंच वादळ उठलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मै भी चौकीदार" असे ट्‌विटर हॅन्डल तयार करून त्यावरून चौफेर बॅटिंग चालविल्याने सर्वोच्च स्तरावरून चाललेल्या चर्चेला एक वेगळं वलय प्राप्त झालंय. मोदी सत्तेवर येण्यापूर्वी 2014 मध्ये झालेल्या निवडणूक प्रचारात "चायवाला" या शब्दावरून वादंग झालं होतं. लहान असताना मोदी चहा विकायचे. तेव्हा "एक चहाविक्‍या देखील देशाचा पंतप्रधान होऊ शकतो," असे अभिमानाने सांगितले जाऊ लागले. तथापि, कॉंग्रेसच्या एका अधिवेशनात कॉंग्रेसचे नेते मणिशंकर अैय्यर यांनी मोदी यांचाच "चायवाला" हा शब्द वापरून त्यांची संभावना केली. त्याचा चटका कॉंग्रेसला बसला, तो इतका की मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष तब्बल 282 जागा मिळवून केंद्रात सत्तेत आला.

मोदी यांनी सत्तेवर येताच स्वतःचे वर्णन "प्रधान सेवक" असे केले. पुढे, "ते अडानी, अंबानी, व उद्योगपतींना मोदी लाभ मिळवून देत आहेत, त्यामुळे भ्रष्टाचार होतोय, असा ठपका ठेवून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी "चौकीदार चौर है" असा आरोप करणे सुरू केले. तथापि, मोदी यांना राहुल गांधी यांचा "सूटबूट की सरकार" हा आरोप जसा चपखल बसला, तसा "चौकीदार चोर है" हा आरोप मर्मस्थानी बसलेला नाही. मोदींमध्ये एक खुबी आहे. ते विपरीत परिस्थितीचे रूपांतर संधित करतात. म्हणून त्यांच्यावर वरील आरोप होताच, त्यांनी देशातील हजारो चौकीदारांना उद्देशून भाषण केले. एवढंच नव्हे, तर, "चौकीदारांना चोर म्हणणारे राहुल गांधी व त्यांचे सहकारी "रक्षण कर्त्याचीच" कशी टिंगल करीत आहेत,"हे त्यांनी पटवून दिले, अन्‌ देशातील चौकीदारांची सहानभूती मोदी यांच्याकडे वळली. तिचे मतदानात परिवर्तन होणार काय? 

चौकीदार शब्दाचं आता इतकं राजकीय भांडवल होतय, की मोदी यांनी देशातील सुमारे 25 लाख चौकीदारांना उद्देशून भाषण केलं. 31 मार्च रोजी दिल्लीतील "मै भी चौकीदार" या कार्यक्रमातून देशातील तब्बल 500 ठिकाणी त्यांनी संवाद साधला. भारतात आजवर जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यात "चौकीदार" या शब्दाचा साधा उल्लेखही झाला नव्हता, की या शब्दाला काही महत्व आहे, असं ना भाजप ना कॉंग्रेस ना कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यानं वाटलं नव्हतं. पण, भाजपला व अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांना आता ध्यानीमनी चौकीदार दिसू लागलाय. जनतेला उद्देशून मोदी म्हणतात, "देशाची सेवा करताना तुमचा चौकीदार (मी) खंबीरपणे उभा आहे. पण, मी एकटा नाही. भ्रष्टाचार, कचरा, समाजात जे काही वाईट आहे, त्याविरूद्ध जो लढा उभारतो, तो प्रत्येक जण चौकीदार आहे.

भारताच्या प्रगतीसाठी जे काबाड कष्ट करीत आहेत, ते सारे चौकीदार होत. आज प्रत्येक भारतीय म्हणतो, की मी चौकीदार आहे."21 मार्च रोजी झालेल्या एका समारंभात मोदी यांनी पुन्हा याच शब्दाचा वापर करून चौकीदार म्हणजे "प्रामाणिकता" व "राष्ट्रभक्त" असे वर्णन केले. हे सारे ठीक, परंतु, मोदी यांना विरोध करणारा कोणताही नेता, विचारवंत, काही स्वतंत्रबुद्धीचे पत्रकार, कलावंत त्यांच्या चौकीदाराच्या व्याखेत बसत नाहीत. भारत लोकशाही आहे, हे मान्य केले, तर विरोध करणारा अथवा सरकारच्या चुका दाखवून देणाराही चौकीदाराच्या व्याख्येत बसावयास हवा. 2019 मध्ये भाजपला मतदान करणारे तेवढे चौकीदार व मत न देणारे मात्र देशद्रोही, असे म्हटले, तर तो पक्षपातच म्हणावा लागेल. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणिबाणीच्या काळात " अफवाए फैलानेवाले देश के दुष्मन है" असे फलक दिल्लीच्या कोपऱ्या कोपऱ्यावर लागले होते. हे, "अफावाए फैलाने वाले" म्हणजे विरोधक मानले जायचे. ते खरे बोलत असले, तरी ते अफवा पसरवित आहेत, असे सरकार मानायचे. 

उरी, पठाणकोट, पुलवामा येथे झालेले दहशतवादी हल्ले आपल्याला का रोखता आले नाही? तेथे चौकीदार कमी पडला का? पडला असेल, तर त्याची कबुली सरकारने का दिली नाही? पंजाब नॅशनल बॅंकेला गंडविणारे निरव मोदी,मेहूल चोक्‍सी यांनी तसेच, बॅंकांना बुडविणारे सुमारे दोन डझन व्यापारी गेल्या तीन वर्षात देशातून पळून गेले, तेव्हा अर्थ व गृहमंत्रालयाचे चौकीदार काय करीत होते? चौकीदार म्हटला, की गृहसंकुले, औद्योगिक वसाहती, कारखाने, बॅंका आदी प्रत्येक इमारतीच्या प्रवेशद्वाराशी गणवेषातील चौकीदार दिसतात. बॅंकेच्या चौकीदारांकडे जुन्यापुराण्या बंदुका दिसतात. चौकीदार म्हणजे रात्री अपरात्री गस्त घालीत, काठी वाजवित सभोवतालची सुरक्षा पाहणारा, असं चित्र डोळ्यासमोर उभं राहातं. देशाचे चौकीदार म्हटलं, की सेनादालांची आठवण येते. सामान्य माणसाला अत्यंत कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या या जवानांची सहसा आठवण होत नाही. काश्‍मीरच्या सीमेवर दहशतवादाशी मुकाबला करणारे जवान रोज धारातीर्थी पडल्याचे वृत्त आपण वाचतो व काही क्षणातच विसरतो. परंतु, ज्यांनी प्राणाची आहुती दिली असेल, त्यांच्या कुटुंबियांवर कोणते संकट कोसळते, याची खरी जाणीव आपल्याला नसते, की त्यांच्या कुटुंबियांना मरणोत्तर आर्थिक मदत देणाऱ्या सरकारलाही नसते. 

मोदी यांनी रोजगाराबाबत बोलताना पकोडेवाल्याचाही उल्लेख केला होता. त्यामुळे अर्थाजन होत असले, तरी ते नेहमीच पुरेसे असते व ती कायमची स्वयंरोजगार योजना बनू शकते, असेही नाही. दरम्यान, शहराशहरातून सहकारी गृह सोसायट्या, संकुले यांच्या प्रवेशद्वाराशी भक्कम लोखंडी दरवाजे उभारण्यात आले असून, ते चोरांपासून चौकीदारांचेही रक्षण करतात. दुसरीकडे, चौकीदारांनी चोरांशी संगनमत करून घरातील कुटुंबे काही दिवसांसाठी बाहेर गेल्यास ती घरे लुटल्याची असंख्य उदाहरणे आहेत. यापेक्षाही पुढे जाऊन लुटमारीत भागीदारी करणे, प्रसंगी खून करण्यातही त्यांचा हात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही अपवादात्मक उदाहरणे होत. "मै भी चौकीदार" असे म्हणून मोदी यांनी या पदाला प्रतिष्ठा भले दिली असेल, परंतु, चौकीदारांना नेमणाऱ्या सुरक्षा कंपन्या पाळीपाळीने दहा ते बारा तास काम करणाऱ्या चौकीदारांना केवळ आठ ते दहा हजार रू. पगार देतात. त्या तुटपुंज्या पगारात त्यांना आपले कुटुंब चालवावे लागते. 

मोदी यांना हॅशटॅगवर मिळाणारा प्रतिसाद व राजकीय नेत्यांच्या त्यावरील खुमासदार टिप्पण्यांनी लोकांचे बरेच मनोरंजन होत आहे. भाजपने तर "मै भी चौकीदारची" मोहीम सुरू केली. दुसरीकडे, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी यांची खिल्ली उडवित म्हटले, "असली चौकीदार का थोडाही इतना फॅशन होता है?"" मोदी यांच्या परीट घडीच्या रोज बदलणाऱ्या पेहरावाकडे त्यांचा निर्देश आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदारांना सल्ला दिलाय, की तुमच्या मुलांनी चौकीदार व्हावे, असे वाटत असेल, तर मोदी यांना मत द्या. ते म्हणाले, ""मोदींना वाटते, की सारा देश चौकीदार बनला पाहिजे, पण, तुमच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, ते डॉक्‍टर्स, इंजिनियरर्स, अभियंते व्हावे, असे वाटत असेल, तर आम आदमी पक्षाला मत द्या. "बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा कु. मायावती म्हणाल्या, "मंत्री स्वतःच्या नावाच्या आधी "चौकीदार" शब्द वापरू लागलेत, हे फारच झाले. "ऑल इंडिया माजलीज-ए-इत्तेहाद उल मुसलमीन पक्षाचे अध्यक्ष असाउद्दीन ओवेसी म्हणाले, "देशाला पकोडेवाला वा चायवालाची गरज नाही, मोदींना रस असेल, तर त्यांना मी चौकीदाराची टोपी व शिट्टी भेट देईन. एका राजकीय नेत्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना "डुप्लिकेट" चौकीदार," असेही म्हटले आहे. 

गेल्या आठवड्यात एअर इंडियाच्या व भारतीय रेल्वेच्या तिकिटांवर मोदी यांचे छायाचित्र छापल्याचे निदर्शनास आले. त्याला निवडणूक आयोगाने जोरदार आक्षेप घेऊन ती तिकिडे रद्द करण्याचा तत्काळ आदेश दिला. मोदी यांच्या देशात व देशाबाहेर असलेल्या प्रचंड लोकप्रियतेकडे पाहता, असल्या क्षुल्लक प्रसिद्धीची त्यांना का गरज भासावी?

Web Title: Vijay Naik Writes an Article about on Chowkidar campaign