Loksabha 2019 : ‘संकटमोचक’ महाजनांच्या जळगावातच भाजपला उमेदवारीचे ‘संकट’!

Loksabha 2019 : ‘संकटमोचक’ महाजनांच्या जळगावातच भाजपला उमेदवारीचे ‘संकट’!

जळगाव - राज्यातील भारतीय जनता पक्षाचे ‘संकटमोचक’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘हनुमान’ म्हणून आता संपूर्ण राज्याला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची ओळख झाली आहे. महापालिका निवडणुकांनंतर लोकसभेची जबाबदारीही त्यांच्यावर असून लोकसभेत कमकुवत असलेल्या मतदार संघात पक्षाचे भक्कम उमेदवार देण्यासाठी थेट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सुपूत्रांना भाजपमध्ये प्रवेश देण्यामागचे सध्या ते सूत्रधार आहेत.

राज्यातील इतर मतदारसंघांच्या उमेदवारीचे संकट ते दूर करीत असले, तरी त्यांच्या जिल्ह्यातील लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासमोर कोण उभा राहणार, याचे ‘संकट’ पक्षासमोर निर्माण झाले आहे.  

जिल्ह्यात जळगाव आणि रावेर दोन मतदारसंघ आहेत. दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे गेल्या वीस वर्षांपासून प्राबल्य आहे. सध्याही दोन्ही ठिकाणी भाजपचेच खासदार आहे. मात्र, जळगाव मतदारसंघातील भाजपचे खासदार ए. टी. पाटील यांची उमेदवारी ‘गोत्यात’ आली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. देवकर यांचा जनसंपर्क मजबूत आहे. अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाला आता तेवढ्याच तोडीचा उमेदवार देण्याचे संकट निर्माण झाले आहे. जळगाव मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत अनेक नावे चर्चेत आहेत. चाळीसगावचे विद्यमान आमदार उन्मेष पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांनी उत्सुकता न दाखविल्याने त्यांचे नाव मागे पडले. पाटबंधारे विभागातील बांधकाम सल्लागार प्रकाश पाटील, विधान परिषदेच्या सदस्या स्मिता वाघ यांच्या नाव अग्रभागी असताना पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार (पाटील) उमेदवारीच्या स्पर्धेत अग्रेसर झाले आहेत. परंतु, पक्षाकडून ठाम निर्णय घेण्यास विलंब लागत असल्याचे चित्र आहे. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाचा उमेदवार दृष्टिपथात असण्याची गरज होती. परंतु, आजच्या स्थितीत पक्षाचे नेतेच उमेदवारीबाबत द्विधा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. अनेक िंठकाणी भाजप उमेदवारासमोर कोण? असे चित्र आहे. परंतु जळगाव लोकसभेत मात्र नेमके उलटे चित्र आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या समोर ‘युती’तील भाजपचे उमेदवार कोण? असे चित्र आहे. 

राज्यात पक्षाला संकटातून सोडविणारे ‘सकंटमोचक’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणारे ‘हनुमान’ म्हणून ओळख झालेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा हा जिल्हा आहे. महाजन सद्य:स्थितीत इतर 

मतदार संघात पक्षाची उमेदवारी बळकट करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सुपुत्रांना पक्षात आणून उमेदवारी देत आहेत. अगदी त्यांनी आता नातवांनाही भाजपत आणू अशी घोषणाच केली आहे. मात्र त्यांच्याच जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे पक्षाचे ‘संकटमोचक’ आपल्याच जिल्ह्यातील मतदार संघाचा तिढा कसा सोडविणार कोण उमेदवार देणार, याकडे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com