Bharti Pawar
Bharti Pawar

LokSabha 2019 : हरिश्चंद्र चव्हाणांना नाराज करून भाजपची आयात उमेदवाराला संधी

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून 'हॅट्‌ट्रीक' केलेले खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीला 'खो' देण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या दोन वर्षांपासून हालचाली सुरु होत्या. अखेर काल (ता. 22) डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादीला "राम-राम' ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला अन्‌ पक्षाने रात्री उशिरा त्यांची उमेदवारी जाहीर केली.

खरे म्हणजे, महाराष्ट्र-गुजरात पाणीप्रश्‍न अन्‌ फलोत्पादनाचा हब असलेल्या शेतीचे प्रश्‍न यातून अगोदर चव्हाण यांच्या रुपाने भाजपसाठी "ऍन्टीकम्बन्सी' तयार झाली होती. आता त्याला उमेदवारी नाकारल्याने चव्हाणांच्या नाराजीचा किनार असेल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा, नाशिक लोकसभा मतदारसंघ वगळता उर्वरित जिल्ह्याच्या कार्याध्यक्षा, जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि कळवण म्हणजे (कै.) ए. टी. पवार असे राजकीय समीकरण बनलेल्या पवारांच्या धाकट्या स्नुषा डॉ. भारती पवार यांना राष्ट्रवादीने मागील लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरीमधून उमेदवारी दिली होती. त्यांना पराभवाच्या धक्का बसला होता.

अशाही परिस्थितीत त्यांनी संघटनात्मक कामाला सुरवात केली होती. त्यामुळे त्या याही वेळेस राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या दावेदार मानल्या जात होत्या. मात्र (कै.) पवार यांचे थोरले पुत्र आणि डॉ. पवार यांचे थोरले दीर जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या भाऊबंदकीमधून शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत प्रवेशकर्ते झालेले दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीने शिक्कामोर्तब केले.

भाऊबंदकीच्या मुद्यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाले यांना उमेदवारी जाहीर झाली त्याचदिवशी अंगुलीनिर्देश केला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीमध्ये व्यस्त असलेल्या डॉ. पवार या कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढवतील अशी स्थिती तयार झाली होती. 

पालकमंत्र्यांची भूमिका ठरली निर्णायक
गेल्या दोन वर्षांपासून चव्हाण यांच्या उमेदवारीला ग्रहण लावण्यासाठी भाजपचे स्थानिक सक्रिय झाले होते. भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली होती. पण मधल्या काळात पालकमंत्री गिरीश महाजन आणि  सानप यांच्यात दुरावा निर्माण झाला. अशातच सर्वेक्षणामध्ये डॉ. पवार या प्रभावी उमेदवार असल्याची चर्चा भाजपच्या गोटातून घडवण्यास सुरवात झाली.

उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरु होताच, चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शब्द मिळवला खरा; पण दुसरीकडे मात्र (कै.) पवार यांना 1990 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेले तत्कालीन खासदार (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांचे पुत्र आणि चांदवड-देवळ्याचे आमदार डॉ. राहूल आहेर, शिवसेनेचे निफाडचे आमदार अनिल कदम, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांच्या समर्थकांनी डॉ. पवार यांना भाजपमध्ये प्रवेशकर्ते करण्यात यश मिळवले. त्यात पालकमंत्र्यांची भूमिका निर्णायक ठरली.

पालकमंत्र्यांनी दिंडोरी मतदारसंघाची जबाबदारी स्वतःवर घेतली. डॉ. पवार यांच्या प्रवेश सोहळ्याचे साधे निमंत्रण चव्हाण यांना देण्याची तसदी न घेतल्याने काल दिवसभर चव्हाण हे आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यस्त होते. उद्या सुरगाण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील दिशा जाहीर करु असे चव्हाण यांनी जाहीर केले होते.

रात्री उशिरा डॉ. पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने चव्हाण यांनी मेळावा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ते आज सकाळी सुरगाण्याकडे रवाना झालेत.

चव्हाणांना उमेदवारी डावलल्याचे शल्य
राष्ट्रवादीने घरगुती वादातून डॉ. पवार यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे आपल्यापेक्षा सरस असलेल्यांना उमेदवारी दिली असते, तर समजण्यासारखे होते, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त करत उमेदवारी डावलल्याचे शल्य गडद झाल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे श्री. चव्हाण आता पुढे काय करतील? हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. याच प्रश्‍नाचा धांडोळा घेतला असता, पालकमंत्र्यांना उत्तर द्यावे लागेल असे चव्हाण यांनी दिलेल्या उत्तराकडे दुर्लक्ष करता येत नाही.

त्याचवेळी त्यांनी आपण अपक्ष आमदार झालो होतो, याचाही उल्लेख केला असल्याने  चव्हाण हे अपक्ष निवडणूक लढवणार काय? याचे उत्तर प्रत्यक्ष उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रियेतून मिळणार आहे.

समजा, त्यांनी निवडणूक लढवली नाही, तर पक्षीय भेदापलीकडे असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनाचे "माप' ते कुणाच्या पारड्यात टाकणार यावर मतदारसंघातील लढत चुरशीची की एकतर्फी होणार याचे उत्तर मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com