Loksabha 2019 : उत्कर्ष पाटलांचा भाजप प्रवेश आमदारांना झोंबला!

Subhash-and-Kunal
Subhash-and-Kunal

धुळे - काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील उमेदवारीचे दावेदार रोहिदास पाटील यांचे पुतणे उत्कर्ष विश्‍वास पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते नेते पाटील, आमदार कुणाल रोहिदास पाटील यांना रुचलेले नाही. या प्रवेशास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे कारणीभूत असल्याचा सूर जवाहर गटात उमटतो. त्याचे उट्टे आमदार पाटील यांनी स्व-पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या सभेत मंत्री भामरे यांच्यावर कडाडून केलेल्या आरोपासह टीकेतून काढल्याचे मानले जाते. 

श्री. गांधी यांची एक मार्चला एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानात महाविराट सभा झाली. धुळे मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत भाजपतर्फे मंत्री डॉ. भामरे आणि काँग्रेसतर्फे माजी मंत्री पाटील यांच्यातच अटीतटीची लढत होणार असल्याचे समर्थक सांगतात. या स्थितीमुळे श्री. गांधी यांच्या सभेत भाजपसह प्रतिस्पर्धी उमेदवार मंत्री डॉ. भामरे यांच्याविषयी काय भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचे लक्ष होते. यात आमदार पाटील आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांना टीकेचे लक्ष्य केल्याचे दिसून आले. 

आमदार पाटील यांची टीका
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात देशाचे जवान शहीद झालेले असताना धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाच्या नावाखाली सभा घेऊन असंवेदनशीलता, माणुसकीला काळिमा फासणारे दर्शन मंत्री डॉ. भामरे यांनी घडविले, ते शैक्षणिक प्रवेश, देवदर्शनासाठी लागणाऱ्या शिफारस पत्रासाठी पैसे घेतात, असा गंभीर आरोप आक्रमक आमदार पाटील यांनी केला. त्यांनी आवाज, संवादाची धार वाढवत मंत्री डॉ. भामरे यांच्यावर टीकेचा आसूड उगारला. संयमी आणि शांत स्वभावाचे आमदार पाटील यांचे सभेतील ते रूप पाहून अनेक जण चक्रावले. त्यामागची कारणे जाणण्याचा प्रयत्न भाजपसह काँग्रेसच्या गटाकडून सुरू झाला. 

भाजपमधील चर्चेचा सूर 
आमदार पाटील यांनी संरक्षण राज्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपासह टीकेमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली. आरोप, टीका व्हावी. मात्र, ती सुसंगत असावी. मंत्री महोदय शिफारस पत्राचे पैसे घेतील का? त्यांच्या पश्‍चात कुणी काही उद्योग केले असतील तर त्यास मंत्र्यांना कसे जबाबदार धरता येईल? उत्कर्ष पाटील यांचा भाजपमधील प्रवेश झोंबल्याने आमदारांनी अशा स्वरूपाची टीका केली. श्री. उत्कर्ष हे सहा महिन्यांपासून भाजप प्रवेशासाठी इच्छुक होते, असे भामरे समर्थक सांगत आहेत. एकूणच निवडणुकीपूर्वी डावपेचांसह निर्माण झालेल्या स्थितीमुळे मंत्री डॉ. भामरे- पाटील आणि माजीमंत्री पाटील यांच्यात टोकाची लढत होणार असल्याचे अनुमान वर्तविले जाते.

चुलतभावाचा प्रवेश खटकला?
चुलतभाऊ उत्कर्ष यांचा भुसावळ येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश, त्यावेळी मंत्री डॉ. भामरे यांची उपस्थिती, तत्पूर्वी संरक्षण राज्यमंत्र्यांच्या येथील संपर्क कार्यालयात उत्कर्ष व मंत्र्यांच्या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होणे यामुळे माजी मंत्री पाटील, आमदार पाटील हे अस्वस्थ झाले. त्यामुळे संतप्त आमदार पाटील यांनी मंत्री डॉ. भामरे यांना शिंगावर घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com