Loksabha 2019 : संकटमोचकच्या जिल्ह्यातच भाजपपुढे पेच

Loksabha 2019 : संकटमोचकच्या जिल्ह्यातच भाजपपुढे पेच

भडगाव - राज्यात भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याच जिल्ह्यात खासदार ए. टी. पाटील यांच्या रूपाने भाजपसमोर संकट उभे राहिले आहे. शिवाय जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांत शिवसेनेने ताठर भूमिका घेतली आहे. आता जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान उभे राहिलेले हे संकट "मोचन' करण्याचे आव्हान महाजनांसमोर खडे ठाकले आहे. ते यातून कसा मार्ग काढतात, याची उत्सुकता कार्यकर्त्यांनाही लागली आहे. 

जळगाव लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळ भाजपच्या तिकिटावर ए. टी. पाटील यांनी बाजी मारली. गेल्या निवडणुकीत तर राज्यात दुसऱ्या क्रमांकांची मते त्यांना मिळाली. त्यामुळे आताही आपल्यालाच तिकीट मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, ऐनवेळी त्यांना डच्चू देत पक्षाने विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे खासदार पाटील हे संतापले आहेत. "माझे तिकीट कापण्याचे कारण द्या' असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या समर्थकांनी त्यांना अपक्ष उमेदवारी करण्याचा आग्रह धरला आहे. मंगळवारी (ता. 26) त्यांनी पारोळ्यात समर्थकांचा मेळावा घेतला, त्याला प्रचंड गर्दी झाली होती. भाजपमधील दुखावलेली मंडळी त्यांच्या बाजूने उभी राहिली. शिवाय समोर न येता अनेकांनी पाठिंबाही दर्शवला आहे. दोन दिवसांत पक्षाने उमेदवारीबाबत पुनर्विचार करावा, असा थेट इशाराच या गर्दीच्या साक्षीने त्यांनी पक्षाला दिला आहे. या मेळाव्यात त्यांनी मंत्री महाजनांवरही निशाणा साधला आहे. खासदार पाटील यांनी थेट बंडाचा पवित्रा घेतल्याने जळगावमध्ये भाजप उमेदवारासमोर मोठी अडचण निर्माण होणार आहे. आता संतापलेल्या खासदारांना मंत्री कोणते औषध देवून शांत करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

दिंडोरी, नगरमध्येही बंडखोरी? 
जळगाव लोकसभा मतदारसंघाप्रमाणे दिंडोरी मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून आलेले भाजपचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांची उमेदवारी कापून राष्ट्रवादीमधून आलेल्या भारती पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेले खासदार चव्हाण मेळावा घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत. त्यांच्याकडूनही बंडखोरीचे संकेत मिळत आहेत. नगरमध्येही विद्यमान खासदार दिलीप गांधींना तिकीट नाकारल्याने त्यांच्या पुत्राने उमेदवारीचे थंड थोपटले आहे. याशिवाय भाजपचे सिन्नरचे माजी आमदार हे देखील नाशिकमधून शिवसेनेच्या उमेदवारासमोर अपक्ष उमेदवारीच्या तयारीत आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपवर बंडाळीचे संकट घोंघावत आहे. आता या संकटांमधून संकटमोचक महाजन कसा मार्ग काढतात, याची उत्सुकता लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com