शिवसेनेपुढे भुजबळांचे कडवे आव्हान

विक्रांत मते
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

युतीच्या जागावाटपात खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. अशातच, राष्ट्रवादीचे ‘आर्मस्ट्राँग’ नेते छगन भुजबळ यांचेही नाव चर्चेत आल्याने शिवसेनेपुढे कडवे आव्हान राहू शकते. बहुजन वंचित आघाडीतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांसमोर उमेदवार न देण्याचे ठरवले. अशातच, अमितच्या विवाहाचे निमित्त साधत भुजबळ पिता-पुत्र-पुतणे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने शिवसेनेविरोधातील मोट पक्की बांधली गेली.

युतीच्या जागावाटपात खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. अशातच, राष्ट्रवादीचे ‘आर्मस्ट्राँग’ नेते छगन भुजबळ यांचेही नाव चर्चेत आल्याने शिवसेनेपुढे कडवे आव्हान राहू शकते. बहुजन वंचित आघाडीतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांसमोर उमेदवार न देण्याचे ठरवले. अशातच, अमितच्या विवाहाचे निमित्त साधत भुजबळ पिता-पुत्र-पुतणे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने शिवसेनेविरोधातील मोट पक्की बांधली गेली.

कधी लाट, तर कधी जातीचे समीकरण निवडणुकीचा रोख ठरवणाऱ्या नाशिक मतदारसंघात या वेळी विकास हा मुद्दा केंद्रस्थानी राहणार आहे. साडेचार वर्षांत नाशिककरांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे. मागील निवडणुकीत जातीचा मुद्दा प्रभावी ठरल्याने छगन भुजबळांचा शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी पराभव केला. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून नाशिकचे प्रश्‍न सुटण्याऐवजी जटील बनवले गेले. परिणामी, आगामी निवडणुकीत नाशिककरांकडून हक्काच्या माणसाचा शोध घेतला जाणार, हे नक्की.

लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजप-शिवसेनेला नाशिककरांनी साथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली. कालांतराने आश्‍वासनांचा फुगा फुटल्याने नाशिककरांना नैराश्‍य आले. दिल्ली अन्‌ मुंबईत नाशिकचे नेतृत्व खमके असावे, या भावनेने मूळ धरलंय. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन, नाशिकचे हक्काचे पाणी मराठवाड्याकडे वळवणे, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र बंद पाडण्याचे प्रयत्न, उद्योगांसाठीचे भूसंपादन, उद्योगांचे स्थलांतर, विकास नियंत्रण नियमावलीतून बांधकाम व्यवसायाची कोंडी, नाशिक-पुणे महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम, नाशिक-पुणे आणि नाशिक-सुरत रेल्वे मार्गाचे कागदावर राहिलेले आश्‍वासन असे विविध प्रश्‍न नाशिककर खुलेआम उपस्थित करत आहेत. सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत धुसफुसीचा ‘बिन-पैशाचा’ तमाशा नाशिककरांना पाहायला मिळतो आहे. महापालिकेने लादलेल्या करवाढीने नैराश्‍याचा कडेलोट केला. नाशिकचे प्रश्‍न मांडायचे तरी कोणाकडे? पालकमंत्री गिरीष महाजन राजकारणात मग्न, तर आमदारांना मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलाच तर मिळते फक्त आश्‍वासन. हेमंत गोडसे यांनी त्यांच्या परीने विकासकामांचा आलेख हलता ठेवलाय. नाशिकहून उडान योजनेंतर्गत दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद विमानसेवा सुरू करण्यात त्यांचा वाटा आहे. मात्र एवढ्यावर नाशिककर समाधानी नाहीत. पायाभूत सुविधा, मुबलक पाणी, रस्त्यांचे जाळे, मुंबई, पुणे, सुरत, औरंगाबाद या औद्योगिक शहरांपासून जवळचे अंतर असताना विकासात मागे राहिल्याची सल नाशिककरांच्या मनात आहे.

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्‍न
    निरंतर विमानसेवा नसल्याने अविश्‍वास
    नवीन उद्योग आणि उद्योगांसाठी भूसंपादन
    अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे
    नाशिक-सुरत, नाशिक-पुणे रेल्वे केवळ आश्‍वासनेच
    दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये नाशिकला स्थान मिळणे

२०१४ ची मतविभागणी
    हेमंत तुकाराम गोडसे - (शिवसेना) ४,९४,७३५ (विजयी)
    छगन चंद्रकांत भुजबळ - (राष्ट्रवादी काँग्रेस) ३,०७,३९९
    डॉ. प्रदीप पवार - (मनसे) ६३,०५०

Web Title: Loksabha Election 2019 Nashik Constituency Chhagan Bhujbal Shivsena Politics