Loksabha 2019 : रावेरमध्ये 'राष्ट्रवादी'कडून उमेदवार आयात?

Loksabha 2019 : रावेरमध्ये 'राष्ट्रवादी'कडून उमेदवार आयात?

जळगाव - लोकसभेच्या रावेर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अद्यापही उमेदवाराचा शोध सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करीत असून, त्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र त्याला कोणीही दुजोरा दिलेला नाही. 

रावेर मतदारसंघात अगोदर भाजपच्या उमेदवाराबाबत प्रश्‍नचिन्ह होते. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे थेट पक्षनेतृत्वावर जाहीरपणे टीका केली होती. त्यामुळे त्यांच्या स्नूषा खासदार रक्षा खडसे यांना पक्षाची उमेदवारी मिळणार काय? याबाबत प्रश्‍नचिन्ह होते. मात्र त्यांना पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केल्याने भाजपतील प्रश्‍न मिटला; परंतु आता विरोधकांसमोर उमेदवार देण्याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. कॉंग्रेसने या जागेची मागणीही केली आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस देण्यास तयार नाही, तर दुसरीकडे पक्षाकडे सक्षम उमेदवारही नसल्याचे दिसून येत आहे. 

उमेदवार निश्‍चित करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगावचा धावता दौरा केला होता. यावेळी त्यांनी माजी कॉंग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली. मात्र, डॉ. पाटील यांनी नकार दर्शवून कॉंग्रेसलाच जागा देण्याची मागणी कायम ठेवली. त्यानंतर पक्षाचे नेते व माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांनी रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उमेदवारीसाठी भेट घालून दिली होती. त्यांचे नाव निश्‍चित होण्याची चर्चा असतानाच पाटील यांनीच पक्षाला आपण इच्छुक नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे आता पुन्हा पक्षाला उमेदवार शोधावा लागत आहे. 

आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे खडसे यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यांनी रक्षा खडसे यांचा प्रचार न करण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्याचवेळी दुसरीकडे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त असून, त्यांना उमेदवारी देण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे. त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याला अद्याप कुठूनही दुजोरा मिळू शकलेला नाही. 
 
चंद्रकांत पाटील हे खडसेंविरुद्ध काम करणार - खलाटे 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकसभा निवडणुकीचे जिल्हा निरीक्षक करण खलाटे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याबाबत दुजोरा दिला आहे. "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, जळगाव व रावेर लोकसभा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पूर्ण व्ह्यूवरचना केली आहे. दोन्ही मतदारसंघात आमचा विजय निश्‍चित होईल, याची खात्री आहे. रावेर मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे चांगला उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आपण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या भावनाही समजून घेतल्या. भाजपचे आमदार एकनाथराव खडसे यांच्याकडून त्यांच्यावर अन्याय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांचे काम करणार नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत त्यांनी कोणतीही चर्चा केलेली नाही; परंतु "आघाडी'च्या उमेदवाराला पूर्णपर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिलेले आहे. रावेरमध्येही भाजपविरोधात सक्षम उमेदवार पक्षातर्फे देण्यात येईल. कॉंग्रेसने या मतदार संघाची मागणी केल्यामुळे त्याचाही विचार करून उद्या (ता. 28) मतदारसंघ कोणाकडे राहील आणि उमेदवार कोण? याचा निर्णय होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com