Loksabha 2019 : 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच! - संजय राउत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

देशात 2014 च्या लोकसभा निवडणुकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असली हवा वाटत नाही, पण असे असले तरी, या वेळी सत्ता मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच मिळवेल, असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

नाशिक - देशात 2014 च्या लोकसभा निवडणुकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असली हवा वाटत नाही, पण असे असले तरी, या वेळी सत्ता मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच मिळवेल, असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेतर्फे एसएसके हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत झाली. त्या वेळी राऊत यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. राऊत म्हणाले, राज्यातील वेगवेगळ्या संघांतील माहिती घेत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकच्या जागेवर विशेष लक्ष आहे. निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांचा कस लागणार आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे देशात देशभक्तीचे वातावरण आहे. लोकांना देशात मजबूत आघाडीचे सरकार हवे आहे. कॉंग्रेसकडे पंतप्रधान पदाचे पाच उमेदवार असल्याने लोकांत संभ्रमावस्था आहे, तर महायुतीतील शिवसेनेसह इतर प्रादेशिक पक्षांना काही दिल्लीत नेते व्हायचे नाही. त्यामुळे आमचा मोदी यांना पाठिंबा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासावर बोलत नसल्याच्या आरोपाचा इन्कार करत ते म्हणाले, महायुतीने विकासाचा मुद्दा सोडलेला नाही. राम मंदिर, कुख्यात दाऊद इब्राहीमसह 15 जणांना देशात आणण्यासह जुने मुद्दे सोडले नाहीत. जेट, बीएसएनएल आणि एअर इंडिया या तोट्यातील कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मंदिराबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार, 65 एकर जागेवर मंदिर उभारणी करून राहिलेल्या 2 एकर जागेबाबत न्यायालयीन लढाई यापुढे कायम ठेवणार आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Sanjay Raut Politics