Loksabha 2019 : पवारांना घाबरून मोदी बरळताहेत - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

केंद्रात भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्यास महाआघाडीसह इतर पक्षांना एकत्र आणून काँग्रेस आणि मित्रपक्षांचे सरकार स्थापन करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आहे. तसेच, राज्यातील महाआघाडीचे शक्तिस्थान पवार आहेत. म्हणूनच, त्यांना घाबरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बरळताहेत, अशी जोरदार टीका आज ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

नाशिक - केंद्रात भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्यास महाआघाडीसह इतर पक्षांना एकत्र आणून काँग्रेस आणि मित्रपक्षांचे सरकार स्थापन करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आहे. तसेच, राज्यातील महाआघाडीचे शक्तिस्थान पवार आहेत. म्हणूनच, त्यांना घाबरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बरळताहेत, अशी जोरदार टीका आज ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

पवार यांची विचासरणी काँग्रेसची आहे. त्यामुळे ते पंडित नेहरू यांच्यापासूनची परंपरा राखण्याचे काम करताहेत. म्हणून पवार हे काँग्रेससमवेत आहेत, असे पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी ‘राष्ट्रवादी’चे समीर भुजबळ यांनी नाशिक, तर धनराज महाले यांनी दिंडोरी मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर महाआघाडीची पत्रकार परिषद झाली. भुजबळ आणि महाले अशा दोन्ही जागा जिंकण्याचा दावा महाआघाडीच्या नेत्यांनी केला. त्यात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, पीपल्स रिपब्लिकनचे जोगेंद्र कवाडे यांचा समावेश होता. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव आदी या वेळी उपस्थित होते.

सरकारच्या सूचनेनुसार छापा मारायचा. खोटी माहिती द्यायची. त्यातून विरोधकांची बदनामी करायची. निवडणूक आयोगाने सरकारचा अशा प्रकारचा यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीचा वापर तत्काळ थांबवावा.
- जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

Web Title: Loksabha Election 2019 Sharad Pawar Narendra Modi Jayant Patil Politics