Loksabha 2019 : युतीचे 43 पेक्षा अधिक उमेदवार विजयी होतील - गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मार्च 2019

लोकसभा निवडणुकीत राज्यात युती 43 पेक्षा अधिक जागा मिळवेल असा विश्‍वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (ता.27) येथे व्यक्त केला.

मालेगाव - राज्यात यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सर्वात बिकट अवस्था आहे. आघाडी तर झाली मात्र समन्वय व ताळमेळ नाही. या उलट भाजप-शिवसेना युतीत समन्वय व सामंजस्य आहे. नरेंद्र पाटील व राजेंद्र गावीत यांची उमेदवारी हेच सांगते. याउलट नगरवरुन झालेला गोंधळ कॉंग्रेसमधील बेदिली दर्शवितो. लोकसभा निवडणुकीत राज्यात युती 43 पेक्षा अधिक जागा मिळवेल असा विश्‍वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (ता.27) येथे व्यक्त केला. 

येथील अमेय लॉन्समध्ये धुळे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी झालेल्या भाजप शिवसेना युतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. श्री. महाजन म्हणाले, देशाला विश्‍वगुरु बनविण्यासाठी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असणे गरजेचे आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार मोदी आहेत असे समजून कामाला लागा. युतीच्या उमेदवारांना विजयी करा असे सांगतानाच केंद्र व राज्य शासनाने सिंचन, आरोग्य, स्वच्छता, दळणवळण, विज्ञान यासह विविध क्षेत्रात केलेल्या कामांचा त्यांनी पाढा वाचला. 

यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, उत्कर्ष पाटील, लालचंद सोनवणे, हिरामण गवळी आदींची भाषणे झाली. युतीच्या आणाभाका घेण्यात आल्या. यापुर्वी महापालिका, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप शिवसेनाच एकमेकाविरोधात लढली. विरोधक नाहीतच, कार्यकर्त्यांनी मतभेद विसरुन पक्षादेश मानून कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्यास भाजप-शिवसेनेचे धुळे लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Loksabha Election 2019 Yuti Shivsena BJP Politics Girish Mahajan