Loksabha 2019 :'या' आदिवासी बहुल भागांमध्ये मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

यावेळच्या लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदान प्रक्रियेत पहिल्यांदाच ग्रामीण आणि आदिवासी विभागातून मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

लोकसभा 2019
नाशिक : आज देशभर लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदान प्रक्रियेतील चौथा टप्पा पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील नाशिक मतदारसंघ आणि मुंबई मतदारसंघातील मतदानाला सकाळपासून जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागात यावेळी मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून आली. 

यावेळच्या लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदान प्रक्रियेत पहिल्यांदाच ग्रामीण आणि आदिवासी विभागातून मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दिंडोरी मतदारसंघातील पेठ हे नगरपंचायत क्षेत्र आदिवासी बहुल असूनही दुपारपर्यंत मतदारांच्या तीन लांबलचक रांगा येथे बघायला मिळाल्या. कोटंबी या आदिवासी बहुल भागात देखील उन्हानं जमीन तापत असताना मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी करत मतदानाचा हक्क बजावला. उमराळे या आदिवासी बहुल भागात सकाळी 9 वाजेपर्यंतच 11 टक्के मतदान झाले होते. करंजाळी येथेही ग्रामस्थांची दुपारपर्यंत गर्दी बघायला मिळाली.

यावर्षी तापमानात झालेल्या वाढीमुळे कदाचित मतदानावर त्याचा परिणाम होईल अशी चर्चा होती. पण आता ही चर्चा फोल ठरली आहे. कारण ग्रामीण भागात आणि आदिवासी बहुल भागात मतदारांनी केलेले मतदानाची टक्केवारी स्तुत्य आहे. हे सर्व भाग गुजरात प्रदेश सीमेला लागून आहेत.  

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सध्या रा. काँ.चे धनराज महाले, भाजपच्या भारती पवार आणि माकपचे जे. डी. गावित अशी तिहेरी लढत आहे. या मतदारसंघात शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. तरी शिवसेनेने या मतदारसंघात कोणताही उमेदवार उभा केलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A spontaneous response to the voting in tribal areas in dindori loksabha constituency