Loksabha 2019 : काकाकडून पुतण्या पक्ष ताब्यात घेण्याच्या तयारीत - पंतप्रधान मोदी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

वर्धा येथील प्रचारसभेत मोदी म्हणाले,

  • ​शरद पवारांना निवृत्त करण्याचे राष्ट्रवादीत प्रयत्न
  • पवार कुटूंबात खलबते सुरु
  • स्वतः शेतकरी असूनही शरद पवार शेतकऱ्यांना विसरले

लोकसभा 2019
वर्धा : महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ भाजपने आज वर्ध्यात फोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा येथे घेण्यात आली. ही सभा सध्या बऱ्याच कारणांनी गाजत आहे. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात शरद पवारांवर डागलेल्या टिकास्त्रामुळे महाराष्ट्रभर अनेक प्रतिक्रीया उमटत आहेत. 
  
मोदी म्हणाले, 'शरद पवार हे देशातील सर्वांत ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते विचार करत होते, मी पंतप्रधान होऊ शकतो. ते म्हणत होते मी निवडणूक लढविणार. पण, त्यांनी अचानक न लढण्याचा निर्णय घेतला. ते म्हणत असतील मी राज्यसभेतच खूश आहे, पण त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली कारण त्यांनी देशातील राजकीय हवा ओळखली आहे.'

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटूंबिक युद्ध सुरु असल्याचीही टिका मोदींनी केली. याविषयी मोदी पुढे म्हणाले, 'शरद पवार यांचा पुतण्या पक्षावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीला तिकीट वाटपात पण अडचण होत आहे. कोठून लढायचे आणि कोठून नाही यातच त्यांचा वाद सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. ते सत्तेत असताना 6-6 महिने झोपतात. सहा महिने झोपून पुन्हा उठतात आणि पैसे खातात. शरद पवार हे स्वतः शेतकरी असून त्यांना शेतकऱ्यांचे दुखः कळले नाही. त्यांच्या कार्यकाळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पुतण्याच्या हातून ते स्वतः हिटविकेट झाले आहेत. त्यांना आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांना निवृत्त करण्याचा प्रयत्न होत आहे.' 

Web Title: Ajit Pawar is trying to capture the party from Sharad Pawar says Narendra Modi in Wardha