Loksabha 2019 : काटोलसाठी भाजपचे दबावतंत्र 

Loksabha 2019 : काटोलसाठी भाजपचे दबावतंत्र 

नागपूर - लोकसभेसाठी मदत नको आहे का? असा इशारा देऊन काटोल विधानसभा मतदारसंघासाठी भाजपच दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे शिवसैनिकांनी राजू हरणे यांना उमेदवारी द्यावी याकरिता उद्धव ठाकरे यांच्याकडे गळ घातली आहे. एकूणच काटोलसाठी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

युतीमध्ये काटोल विधानसभा मतदारसंघ २५ वर्षांपासून शिवसेनेकडे होता. सेनेचा आजवर एकही उमेदवार येथून निवडून आला नाही. अनिल देशमुख यांना पराभूत करण्यासाठी सेनेने अनेक प्रयोग केले. सतीश शिंदे जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांना उमेदवारी दिली होती. नागपूरचे किरण पांडव यांनाही उमेदवारी दिली होती. मात्र, सर्वच प्रयोग फसले. मागील निवडणुकीत ऐनवेळी युती तुटल्याने शिवसेनेची चांगलीच पळापळ झाली होती. त्यामुळे शिवसेनेने आपल्याच शिवसैनिकावर विश्‍वास टाकून राजू हरणे यांना उमेदवारी दिली. त्यांनी १२ हजार मते घेतले. शिवसेनेकडे काटोल असल्याने भाजप या मतदारसंघाकडे फारसे लक्ष देत नव्हता. मागील निवडणुकीत भाजपने अनिल देशमुख यांचे पुतणे व रणजित देशमुख यांचे चिरंजीव यांना उमेदवारी देऊन सर्वांनाच धक्का दिला. आशीष देशमुख यांनी काका अनिल देशमुख यांना पराभूत करून सलग चार निवडणुका जिंकण्याची अनिल देशमुख यांची घोडदौड रोखली. काटोलमध्ये यश मिळवून दिल्याने साहजीकच भाजपने आता या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. मध्यंतरीच्या काळात अविनाश ठाकरे यांची विस्तारप्रमुख म्हणून नेमणूक केल्याने भाजपने काटोलमध्ये आणखी आपली पाळेमुळे घट्ट केली. आशीष देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मतदारांचे कौल जाणून घेतले. यात सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने भाजपला ही जागा गमवायची नसल्याचे समजते. 

शिवसैनिकांना चिंता
नागपूर शहरातील सर्व सहा मतदारसंघ भाजपने हिसकावून घेतले. ग्रामीणमधील हिंगणाही आपल्या ताब्यात घेतला. सेटिंग-गेटिंग फॉर्म्युला लावल्यास रामटेक आणि काटोल विधानसभा मतदारसंघही हातचा जाईल. संपूर्ण जिल्ह्यात एकही विधानसभा मतदारसंघ नसल्यास शिवसेनेचे अस्तित्वच संपून जाईल, अशी भीती शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत काटोल सोडू नये, अशी मागणी शिवसैनिकांची आहे. 

आज भाजप उमेदवारांची चाचपणी 
काटोल मतदारसंघात भाजप शिवसेनेपेक्षा मजबूतस्थितीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांनी काटोल भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी महाल कार्यालयात बैठक बोलाविली आहे. यात कार्यकर्त्यांशी चर्चा व इच्छुकांकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यामुळे भाजपने काटोलवरून दावा सोडला नसल्याचे स्पष्ट होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com