Loksabha 2019 : विदर्भात कॉंग्रेसचा "डीएमके' पॅटर्न 

संजय मिस्कीन
शनिवार, 6 एप्रिल 2019

महाराष्ट्रात 2014 च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कॉंग्रेसने जातीय समीकरणांची जुळवाजुळव केली आहे. यामधे सर्वाधिक बेरजेचे राजकारण विदर्भात केले असून, दलित - मुस्लिम - कुणबी मतदारांना आकर्षित करणारा "डीएमके' पॅटर्न राबवला आहे. 

मुंबई - महाराष्ट्रात 2014 च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कॉंग्रेसने जातीय समीकरणांची जुळवाजुळव केली आहे. यामधे सर्वाधिक बेरजेचे राजकारण विदर्भात केले असून, दलित - मुस्लिम - कुणबी मतदारांना आकर्षित करणारा "डीएमके' पॅटर्न राबवला आहे. 

विदर्भात दहा मतदारसंघ असून, आठ जागांवर कॉंग्रेस, तर दोन जांगावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. मागील निवडणुकांत या दहापैकी एकही जागा आघाडीला जिंकता आलेली नव्हती. पोटनिवडणुकीत मात्र भंडारा - गोंदियाची जागा जिंकत कॉंग्रेसने जातीय समीकरणांची चाचपणी केली होती. भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन नाना पटोले यांनी कॉंग्रेस प्रवेश केला. पटोले हे कुणबी समाजाचे नेते असून, या जातीच्या प्रश्‍नासंदर्भात त्यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. त्यामुळे, पटोले यांना कुणबी समाजाचा चेहरा म्हणून कॉंग्रेसने समोर केले आहे. 

विदर्भात सर्वच मतदारसंघात कुणबी समाजाची मते निर्णायक आहेत. त्यामुळे आठ पैकी सहा जागांवर कॉंग्रेसने कुणबी समाजाचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. चंद्रपूरमध्ये नाना पंचबुद्घे, भंडारा गोंदियातून बाळा धानोरकर, वर्धामधे चारुलता टोकस, यवतमाळमध्ये माणिकराव ठाकरे, तर नागपूरमधून नाना पटोले या कुणबी समाजाच्या नेत्यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. कुणबी समाजासोबत मागास व मुस्लिमांची मतेदेखील आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेसने राज्यात अकोला लोकसभेत हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पटेल हे राज्यात कॉंग्रेसचे एकमेव मुस्लिम उमेदवार आहेत. रामटेक या राखीव मतदारसंघातही कॉंग्रेसने माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली आहे. गजभिये हे बौद्घ समाजातील उमेदवार आहेत. हिंदू मागास उमेदवार देण्यापेक्षा येथे कॉंग्रेसने बौद्ध मागास उमेदवार देत विदर्भातील बौद्ध मागासांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. 

प्रचारात आघाडी 
कॉंग्रेसचा हा पॅटर्न म्हणजेच "डीएमके' पॅटर्न असल्याची चर्चा सुरू आहे. दलित (डी), मुस्लीम (एम) व कुणबी (के) असा याचा संदर्भ लावून प्रचारात आघाडी घेतली आहे. 

या वेळी विदर्भात शेती व रोजगारासोबतच दुष्काळाच्या मुद्‌द्‌यावर प्रचाराची भिस्त ठेवण्यात आली आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भात "डीएमके' पॅटर्ननुसार जोरदार टक्‍कर देण्याची अटकळ कॉंग्रेसने बांधल्याचे मानले जाते.

Web Title: Congress has implemented the DMK pattern attracting voters in Vidarbha