Loksabha 2019 : पटोले माझे मित्र; त्यांना आशिर्वाद- गडकरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

नागपूर - कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले आपले मित्र आहेत. ते माझ्या विरोधात लढणार असले तरी मैत्री कायम राहील, असे सांगून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पटोले यांना आशीर्वाद दिले. लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला असल्याने नानांचे माझ्या विरुद्ध लढण्यात काही वावगे नाही, असेही गडकरी म्हणाले. 

नागपूर - कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले आपले मित्र आहेत. ते माझ्या विरोधात लढणार असले तरी मैत्री कायम राहील, असे सांगून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पटोले यांना आशीर्वाद दिले. लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला असल्याने नानांचे माझ्या विरुद्ध लढण्यात काही वावगे नाही, असेही गडकरी म्हणाले. 

नाना पटोले यांची उमेदवारी दिल्यानंतर प्रसिद्ध माध्यमांनी आज गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रचारात टीका-टिपणी व आरोप-प्रत्यारोप होतच असतात असे सांगून पंतप्रधानांसारख्या देशाच्या प्रमुखावर टीका करताना मर्यादा राखावी असा सल्लाही विरोधकांना दिला. पंतप्रधान हा कुठल्या एका पक्षाचा नव्हे तर देशाचा असतो. त्या पदाचा मानसन्मान राखणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ध्येयधोरणाला विरोध करणे, टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे. आम्हालाही त्याचे वाईट वाटण्याचे कारण नाही. नागपूरचा मतदारसंघ आपला परिवार आहे. आपणसुद्धा विरोधकांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार नाही. विचारांचा मुकाबला विचारांनीच करायचा असतो आणि केला पाहिजे. जनता ज्याला निवडून देईल तो सत्तेत असतो तर पराभूत विरोधी पक्षात. जनतेने जी जबाबदारी दिली ती भूमिका राजकारण्यांना वठवावी लागते. आपणसुद्धा अनेक वर्षे विरोधी पक्षात होतो असेही गडकरी यांनी सांगितले. मागील निवडणुकीत आपल्या विरोधात प्रचार करणाऱ्या लोकांचीही आपण कामे केली. जात, धर्म, पंथ, भाषा, पक्ष असा भेद कधीच केला नाही. आजवर केलेल्या कामांच्या भरोशावरच जनतेसमोर जाणार आहोत. यावेळी 2014 च्या निवडणुकीपेक्षाही जास्त मताधिक्‍याने निवडून येऊ असा विश्‍वासही गडकरी यांनी व्यक्त केला. 

मोदींची सभा नागपूरला? 
मागील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागपूर एकही प्रचार सभा झाली नव्हती. यावेळी ते येणार आहेत का अशी विचारणा केली असता नागपूर आणि अमरावती येथे त्यांची प्रचार सभा होण्याची शक्‍यता असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Web Title: Loksabha 2019 my blessings with nana patole says nitin gadkari