Loksabha 2019 : भाजपसमोर बंडखोरीचे आव्हान

दीपक फुलबांधे
गुरुवार, 4 एप्रिल 2019

निवडणूक रिंगणातील नवे चेहेरे, भाजपमधील नाराजी आणि बंडखोरी, तसेच प्रमुख दोन्हीही पक्षांकडून कुणबी उमेदवार आणि बहुजन समाज पक्षानेही दिलेला उमेदवार यामुळे येथील लढत तिरंगी तर होणारच, शिवाय स्थानिक आणि राष्ट्रीय अनेक मुद्दे प्रचारात गाजणार हे निश्‍चित.

निवडणूक रिंगणातील नवे चेहेरे, भाजपमधील नाराजी आणि बंडखोरी, तसेच प्रमुख दोन्हीही पक्षांकडून कुणबी उमेदवार आणि बहुजन समाज पक्षानेही दिलेला उमेदवार यामुळे येथील लढत तिरंगी तर होणारच, शिवाय स्थानिक आणि राष्ट्रीय अनेक मुद्दे प्रचारात गाजणार हे निश्‍चित.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे या उमेदवारांत मुख्य लढत होत असली तरी, बहुजन समाज पक्षाच्या डॉ. विजया नांदुरकर यांच्या उमेदवारीमुळे त्रिकोणी लढत रंगण्याची शक्‍यता आहे. बंडखोर उमेदवार राजेंद्र पटले यांच्यामुळे भाजपला फटका बसू शकतो. मतदारसंघात कुणबी मतदार मोठ्या संख्येने आहे. या वेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी कुणबी उमेदवार दिलेत. यामुळे पोवार, कोहळी, तेली, माळी इत्यादी समाजाला प्रतिनिधित्व मिळालेले नाही.

तसेच भाजप, राष्ट्रवादीने गोंदिया जिल्ह्याला प्रतिनिधित्व दिलेले नाही. निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपाइं यांच्या आघाडीमुळे इतर राजकीय पक्षांत होणारे मतविभाजन टळले आहे. पण ‘बसप’च्या केडरबेस्ड मतपेटीमुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे. सोशल मीडियाचा आधार घेऊन उमेदवारांनी प्रचार सुरू केलाय.

मतदारसंघात रोजगार, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, शेतीला सिंचन, धानाला वाढीव भाव हे प्रमुख मुद्दे आहेत. गोसेखुर्द प्रकल्पामुळे विस्थापित ३४ गावांतील प्रकल्पग्रस्तांनी निवडणुकीवर बहिष्कार जाहीर केलाय. तसेच अड्याळ तालुका निर्मितीच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय. भेल प्रकल्पाचे काम पूर्ण करून बेरोजगारांना रोजगार देण्याची आवश्‍यकता आहे. मोठ्या सिंचन प्रकल्पांचा लाभ शेतीला देण्याची गरज आहे. कर्जमाफी, दुष्काळ निधी, फसवी ठरलेली पीकविमा योजना, सिंचन सुविधांचा अभाव, ढेपाळलेली प्रधानमंत्री मुद्रा योजना, तरुणांना कर्ज देण्यास बॅंकांची आडकाठी या मुद्यांवर विरोधक भर राहील, असे चित्र आहे.

Web Title: Loksabha Election 2019 BJP Rebel Politics