Loksabha 2019 : तिरंगी नव्हे; थेटच लढत

अरुण जैन
गुरुवार, 4 एप्रिल 2019

प्रमुख प्रश्न

  • परंपरागत रखडलेला जालना-खामगाव रेल्वेमार्ग. 
  • जिगाव प्रकल्प पूर्ण करण्याची गरज. 
  • औद्योगिक मागासलेपण अद्याप कायम.
  • शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांची आवश्‍यकता.

युती आणि आघाडी यांचे कार्यकर्ते झपाटून आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. खेडोपाडी दौरे, मोठ्या गावांना पिंजून काढणे यामुळे लढतीतील चुरस वाढली आहे. मतदारसंघातले चित्र झपाट्याने पालटत आहे.

वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीत रिंगणात घेतलेल्या उडीमुळे वरवर तिरंगी वाटणारी बुलडाण्यातील लढत आता सरळ लढतीकडे वाटचाल करताना दिसते. त्यामुळे २००९ चेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या पैलवानांमध्ये थेट लढत होईल, असे चित्र सध्यातरी दिसते. सुमारे १५ दिवसांपूर्वीच बुलडाणा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले होते. 

शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि बहुजन वंचित आघाडीचे आमदार बळिराम सिरस्कार असा तिरंगी सामना रंगेल, असे वाटत होते. मात्र आज एकीकडे शिवसेना उमेदवार संपूर्ण जिल्हा पिंजून काढत आहे. पक्षाचे दोन्ही आमदार मेहनत घेताहेत. भाजपचीही त्यांना साथ आहे. दुसरीकडे डॉ. शिंगणेंसाठी काँग्रेसचे आमदार सपकाळ, जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे, श्‍यामबाबू उमाळकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते जोरदार प्रचार यंत्रणा राबवीत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरही आघाडीसाठी आक्रमक झाले आहेत. अशा स्थितीत बहुजन वंचित आघाडीचा ना दांडगा जनसंपर्क सुरू आहे, ना नेते कुठे फिरताना दिसताहेत. 

२००९ च्या निवडणुकीत जाधव यांना ३ लाख ५३ हजार ६७१, तर डॉ. शिंगणेंना ३ लाख २५ हजार ५९३ मते मिळाली होती. त्या वेळी बसपचे उमेदवार वसंतराव दांडगे होते. ते माळी समाजातील असल्याने, तेव्हाही लढत तिरंगी होईल, असा अंदाज होता. मात्र दांडगेंना लाखाचा आकडाही पार करता आला नाही. केवळ ८१ हजार ७६३ मतेच मिळाली. आजची परिस्थितीसुद्धा फारशी वेगळी नाही. पुढील १५ दिवसांत कोणत्या सभा गाजतात आणि परिस्थिती काय वळण घेते, हे आज सांगता येत नसले तरी सुरवातीला तिरंगी वाटणारा सामना आजतरी थेट लढतीकडे वळताना दिसतोय.

प्रमुख प्रश्न
    परंपरागत रखडलेला जालना-खामगाव रेल्वेमार्ग. 
    जिगाव प्रकल्प पूर्ण करण्याची गरज. 
    औद्योगिक मागासलेपण अद्याप कायम.
    शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांची आवश्‍यकता.

Web Title: Loksabha Election 2019 Buldhana Constituency Politics Shivsena NCP