Loksabha 2019 : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

निवेदन देणारे शेतकरी स्थानबद्ध
नाफेडद्वारे मागील हंगामात खरेदी केलेल्या तूर व हरभऱ्याचा मोबदला तालुक्‍यातील ७३ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. नरखेड-काटोल तालुका दुष्काळग्रस्त आहे, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे शासनाने मागच्या हंगामातील तूर व हरभऱ्याचे थकीत पैसे देण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी पोहोचलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. यामुळे शेतकऱ्यांनी याचा निषेध व्यक्त केला.

जलालखेडा / सावनेर - काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात आयपीसी कलम १२४ अ कलम रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा देश मोदींच्या हातात द्यायचा की विरोधी लोकांच्या हातात द्यायचा, याचा विचार मतदारांनी करावा. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असून ती कधीच पूर्ण होणार नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

रामटेक लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचारासाठी नरखेड व सावनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देत गडकरी यांनी विदर्भाच्या सिंचनाकरिता २५ हजार कोटी दिले असून १ हजार कोटींच्या रस्त्यांची निर्मिती सुरू असल्याचे सांगितले. विदर्भ व मराठवाड्याकरिता तिजोरी राज्य सरकारने उघडी केली आहे. मुद्रा योजनेत बेरोजगारांना बिनव्याजी कर्ज देऊन रोजगार निर्मिती केल्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. देशातील गरिबी फक्त मोदीच हटवू शकतात, असे सांगून मोदी सरकारने दहशतवादावर नियंत्रण मिळविल्याचे ते म्हणाले. मोदींना प्रधानसेवक बनविण्यासाठी युतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांना विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले. 

यावेळी शिवसेना नेते डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना उमेदवार कृपाल तुमाने, अशोक मानकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जि. प. सभापती उकेश चौहान, चरणसिंग ठाकूर, रमेश मानकर, रमेश कोरडे, आरपीआयचे भीमराव बंसोड, मोवाडचे नगराध्यक्ष सुरेश खसारे, काटोलच्या नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, काटोल पं. स. चे सभापती संदीप सरोदे, हिम्मत नखाते, डॉ. प्रेरणा बारोकर, अजय बालपांडे, मनोज कोरडे, भारत अरमरकर उपस्थित होते.

Web Title: Loksabha Election 2019 Congress Declaration Politics Devendra Fadnavis