Loksabha 2019 : लोकसभेची निवडणूक म्हणजे 60 विरुद्ध 5 वर्षे! - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

पणजोबा, आजी, वडील, आई आणि आता स्वतः राहुल गांधी या देशातील गरिबी हटविण्याची भाषा बोलत आहेत. "त्यांना लाज कशी वाटत नाही', अशा नुसत्या घोषणांनी गरिबी दूर होत नाही. गरिबी दूर करण्याचे काम खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात झाले. त्यामुळे या वेळची लोकसभेची निवडणूक ही 60 वर्षे विरुद्ध पाच वर्षे अशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अकोला येथे केले.

अकोला - पणजोबा, आजी, वडील, आई आणि आता स्वतः राहुल गांधी या देशातील गरिबी हटविण्याची भाषा बोलत आहेत. "त्यांना लाज कशी वाटत नाही', अशा नुसत्या घोषणांनी गरिबी दूर होत नाही. गरिबी दूर करण्याचे काम खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात झाले. त्यामुळे या वेळची लोकसभेची निवडणूक ही 60 वर्षे विरुद्ध पाच वर्षे अशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अकोला येथे केले.

भाजप-शिवसेना युतीचे अकोला लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी आज जाहीर सभा झाली. त्यात फडणवीस यांनी त्यांच्या भाषणाची सुरवातच देश सुरक्षेच्या मुद्यावरून करीत सुरक्षा व विकासाच्या मुद्यावर मतांचा जोगवा अकोल्याच्या जनतेकडे मागितला. ""या देशाने 60 वर्षे अन्याय, भ्रष्टाचारी, भूलथापा देणारे सरकार पाहिले आहे. देशात 60 वर्षांत जे जमले नाही, ते मोदी यांच्या नेतृत्वात पाच वर्षांत करून दाखविल्याचा दावाही त्यांनी केला. पाच-पाच पिढ्यांपासून एकच घोषणा करीत आहे, यांना लाज कशी वाटत नाही,'' असे टीकास्त्र त्यांनी कॉंग्रेसवर सोडले.

रॉकेटला बांधून कॉंग्रेस नेत्याला पाठविले असते
पुलवामा घटनेनंतर भारतीय जवानांनी धाडसी कारवाई करीत पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये कारवाई केली. या कारवाईचे पुरावे दोनच जण मागत आहेत. त्यात एक पाकिस्तान आणि दुसरे कॉंग्रेस नेते. पुरावे काय मागता, आधी सांगितले असते तर रॉकेटला बांधून एखाद्या कॉंग्रेस नेत्याला पाठविले असते आणि भारतीय सैन्याने कोणता पराक्रम केला हे दाखविले असते, असे ठणकावून मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला.

Web Title: Loksabha Election 2019 Devendra Fadnavis BJP Congress Politics