Loksabha 2019 : गांधी कुटुंबाला हवी देशाची मालकी - उमा भारती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

दीडच वर्षात राजकारणात परतणार
मला इच्छित ठिकाणी उमेदवारी देण्याची पक्षाची तयारी आहे. त्यानंतर मंत्रिपदही मिळाले असते. पण, गंगा शुद्धीकरणाचे थोडे काम अजूनही शिल्लक आहे. उर्वरित कार्यासाठी मंत्री नाही तर लोकांना जोडणारा दुवा हवा आहे. या कार्यासाठी सुमारे दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. म्हणूनच यंदाची निवडणूक लढविली नाही. परंतु, पुढच्या निवडणुकीत पक्ष देईल ती जबाबदारी निश्‍चितच सांभाळेन. राजकारणातील ‘कट ऑफ’ची ७५ वर्षे मानली तरी आपल्याकडे अजूनही १७ वर्षे शिल्लक असल्याचे उमा भारती म्हणाल्या.

नागपूर - गांधी कुटुंबाला कोणतीही जबाबदारी न स्वीकारताच देशावर मालकी हक्क मिळवून केवळ ‘रेव्हेन्यू कलेक्‍शन’ करायचे असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी आज येथे केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोधी क्षत्रिय संस्थेतर्फे मंगळवारी शुक्रवारी तलावाजवळील रजवाडा पॅलेस येथे आयोजित स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, काँग्रेस नेतृत्व गैरजबाबदार आहे. त्यांना स्वत:कडे कोणतीही जबाबदारी नको आहे. 

सत्ता आल्यास मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करून रिमोट कंट्रोल आपल्याकडे ठेवायचा आहे. यापूर्वीही त्यांनी हेच केले. दुसरीकडे ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी आणि भाजपला प्रत्येक शहर आणि गावात चौकीदार ठेवायचा आहे. यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गतवेळपेक्षा अधिक मताधिक्‍याने निवडून द्या, त्यात लोधी समाजाचे प्रयत्न लक्षणीय असावेत, असे आवाहन त्यांनी केले. केंद्राच्या ओबीसी आरक्षण यादीत लोधी समाजाचा समावेश निश्‍चितच करून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. यावेळी आमदार विकास कुंभारे, नगरसेवक किशोर कुमेरिया, दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

राम राजकारणाचा नाही तर आस्थेचा विषय असून भाजपच्या जाहीरनाम्यात राममंदिरासह कलम ३७० चा समावेश राहणार असल्याचे भारती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Gandhi Family Uma Bharti Politics