Loksabha 2019 : मोदी देशासाठी राष्ट्रीय आपत्ती - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

नरेंद्र मोदी हीच देशावर आलेली राष्ट्रीय आपत्ती आहे. ती घालवणे आवश्‍यक आहे. ही परिवर्तनाची वेळ असल्याने ती वाया दवडू नका, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे केले. गांधी परिवाराने देशाचे नुकसान केल्याच्या बोंबा मारणाऱ्या या सरकारने पाच वर्षांत काय दिवे लावले ते आधी सांगा, असेही ते म्हणाले.

अमरावती - नरेंद्र मोदी हीच देशावर आलेली राष्ट्रीय आपत्ती आहे. ती घालवणे आवश्‍यक आहे. ही परिवर्तनाची वेळ असल्याने ती वाया दवडू नका, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे केले. गांधी परिवाराने देशाचे नुकसान केल्याच्या बोंबा मारणाऱ्या या सरकारने पाच वर्षांत काय दिवे लावले ते आधी सांगा, असेही ते म्हणाले.

कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत आघाडीच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, की पाच वर्षे सत्तेत राहिलेल्या या सरकारने 2014 मध्ये दिलेली आश्‍वासने पूर्ण केली नाहीत. नेहरू- गांधी परिवारासोबतच आता ते माझ्या परिवारावर टीका करायला लागले आहेत. माझ्या परिवाराची त्यांनी चिंता करू नये. मोदी सरकारसह भाजप व रा. स्व. संघाला जगातील सर्वात मोठी विविध भाषा, धर्म आणि जाती असलेली लोकशाही मोडून हुकूमशाही आणायची आहे.

वर्धा येथील मोदींच्या सभेचा विशेषत्वाने उल्लेख करीत ते म्हणाले, स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणाऱ्या मोदींना सेवाग्रामला जाण्याची उपरती झाली नाही. नाटके करण्यात ही व्यक्ती राजा आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, कर्जमाफी, धनगर, मराठा व मुस्लिम समाजाचे आरक्षण, रोजगाराबाबत दिलेली आश्‍वासने ही त्यांची नाटके होती, असेही ते म्हणाले.

मोदींनी चिंता करू नये
यूपीएला "महामिलावट' म्हणण्यावर सडेतोड उत्तर देत, एनडीएत 36 पक्ष सहभागी असल्याची आठवण पवार यांनी करून दिली. ते म्हणाले, महागठबंधनमध्ये नेतृत्व कोण करेल, असा त्यांना प्रश्‍न पडला आहे. यावर 2004 ची आठवण करून देत डॉ. मनमोहनसिंह यांच्यासारखा जगभरात स्वच्छ चारित्र्याचा नेता असल्याने नेतृत्वाची चिंता करण्याची त्यांना गरज नाही, असेही ठणकावले.

Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi National Disaster Sharad Pawar Politics